
अहमदनगर (दि १० एप्रिल २०२१) : रात्रीच्या वेळी प्रवाशांना गाडीत बसवून मारहाण व लुटमार करणारी टोळी गजाआड करण्यात कोतवाली पोलिसांना यश आले आहे. शुभम भागाजी बुगे (रा. बुगेवाडी, पारनेर), विनोद सुधाकर पाटोळे (रा. बहिरवाडी, ता. नगर), आकाश संतोष नायकोडी (रा. जामगाव, पारनेर) आणि दोघे अशा पाच जणांना ताब्यात घेतले आहे. आरोपींकडून चार लाख 15 हजार रूपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
दि. 2 एप्रिल रोजी फिर्यादी अंबरनाथ सांगळे यांना एका कारने प्रवासी म्हणून बसवून निमगाव वाघा शिवारात नेवून लुटण्यात आले होते. फिर्यादी सांगळे यांना लोखंडी रॉडने मारहाण करून् त्यांच्याकडील मोबाईल, रोख रक्कम आणि एटीएम कार्ड बळजबरीने काढून घेण्यात आले होते. सांगळे यांच्या फिर्यादीवरून कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. अशाचप्रकारचा अजून एका गुन्हा कोतवाली पोलिस ठाण्यात दाखल होता.
या गुन्ह्यांचा तपास करताना पोलिसांना माहिती मिळाली की, लुटमार करणारे आरोपी नगर शहराकडे नेप्ती रोडने येणार आहेत. त्यानुसार पोलिसांनी सापळा लावून आरोपींना ताब्यात घेतले. आरोपींनी गुन्ह्यांची कबुली दिली असून आरोपींनी कोतवाली पोलिस ठाण्यासह एमआयडीसी आणि नगर तालुका पोलिस ठाण्यात हद्दीत याप्रकारची गुन्हे केले आहेत.
आरोपी शुभम बुगे याच्याविरोधात विविध ठिकाणी 22, आरोपी विनोद पाटोळे याच्याविरोधात 13 तर आरोपी आकाश नायकोडी याच्याविरोधात पाच गंभीर गुन्हे दाखल आहेत. या गुन्ह्याचा अधिक तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक विवेक पवार करत आहेत.
सदरची कारवाई पोलिस अधीक्षक मनोज पाटील, अपर पोलिस अधीक्षक सौरभ अग्रवाल, उपविभागीय अधिकारी अजित पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक राकेश मानगावकर, सहाय्यक निरीक्षक विवेक पवार, पोना. गणेश धोत्रे, विष्णू भागवत, नितीन शिंदे, शाहीद शेख, योगेश भिंगारदिवे, सागर पालवे, पोकॉ. भारत इंगळे, सुमित गवळी, योगेश कवाष्टे, कैलास शिरसाठ, तान्हाजी पवार, सुशिल वाघेला, सुजय हिवाळे, प्रमोद लहारे, सोमनाथ राऊत, मोबाईल सेलचे पोकॉ. प्रशांत राठोड यांनी केली आहे.
