
आर्थिक कोंडी ही शासनास व नागरिकांनाही परवडणारी नाही यामुळे टाळेबंदीच्या निर्णयामध्ये शिथिलता आणावी : आमदार संग्राम जगताप
अहमदनगर । टाळेबंदी नियमावलीत शिथिलता करुन व्यापारी बाजारपेठा सुरु करण्याची मागणी आमदार संग्राम जगताप यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, पालकमंत्री यांच्याकडे केली आहे. टाळेबंदीच्या नियमावलीमुळे नागरिक व व्यापार्यांमध्ये शासनाविषयी रोषाची भावना निर्माण झाली आहे. लॉकडॉनच्या निर्णयामुळे नागरिकांच्या दैनंदिन जीवनावर परिणाम झाला आहे. व्यापारी बाजारपेठा बंद राहिल्याने व्यापार्यांसह काम करणारे कामगार बेरोजगार झाले आहेत. त्यामुळे टाळेबंदीस सर्वांचा विरोध आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सरकारने घालून दिलेल्या नियमांचे पालन नागरिकांकडून केले जात असून व्यापारी बाजारपेठा बंद न ठेवता त्या सुरु करण्यास शासनाकडून संबंधित यंत्रणेस आदेश होणे गरजेचे आहे. बाजारपेठा सुरु करतांना कोविड 19 चा प्रादूर्भाव टाळण्याच्या दृष्टीने उचित उपाययोजना करण्याबाबत सुचित करावेत. आर्थिक कोंडी ही शासनास व नागरिकांनाही परवडणारी नाही. यामुळे टाळेबंदीच्या निर्णयामध्ये शिथिलता करुन व्यापारी बाजारपेठा सुरु करण्यात याव्यात अशी मागणी आ. जगताप यांनी केली आहे.
