अहमदनगर : वारंवार आंदोलने, मोर्चे, निवेदनेही देऊनही कल्याण रोड परिसरातील पाणी प्रश्न सुटायला तयार नाही. त्यामुळे पाणी प्रश्न तातडीने सोडविण्यात यावा या मागणीसाठी नगरसेवक शाम नळकांडे यांनी जागरण गोंधळ व बोंबाबोंब आंदोलन, तसेच नगरसेवक सचिन शिंदे यांनी आत्मदहन करण्याचा इशारा दिला आहे.महापालिकेच्या अंदाजपत्रकीय सभेमध्ये प्रभाग क्रमांक 8 चे नगरसेवक शाम नळकांडे यांनी कल्याण रोडच्या पाणीप्रश्नावर प्रशासनाला धारेवर धरले नागरिकांचे पाण्यावाचून मोठ्या प्रमाणात हाल होत असल्यामुळे नागरिक त्रस्त आहेत.

या त्रासापासून मुक्तता मिळण्यासाठी प्रशासनाने लवकरात लवकर उपाययोजना कराव्यात. गेली 10-15 वर्षापासून पाणीप्रश्नासाठी विविध आंदोलन, मोर्चे, उपोषणे तसेच नागरिकही वेळोवेळी रस्त्यावर आले आहे. परंतु झोपलेल्या महापालिका प्रशासनाला आजपर्यंत जाग आलेली नाही. मुळा धरणात पाणी असूनही नागरिकांना पाणी मिळत नाही.

10 ते 12 दिवसांनी होणार्‍या पाणीपुरवठ्यामुळे नागरिक हतबल झाले आहेत. झोपलेल्या प्रशासनाला जाग आणण्यासाठी महापालिकेमध्ये 8 एप्रिल रोजी जागरण गोंधळ व  बोंबाबोंब आंदोलन करणार असल्याचे नगरसेवक शाम नळकांडे यांनी सांगितले.नगरसेवक सचिन शिंदे म्हणाले, कल्याणरोडच्या 200 वर्षापासून प्रलंबित असलेल्या पाणीप्रश्नासासाठी महापालिकेकडे वारंवार पत्रव्यवहार, मोर्चे,आंदोलने, रास्ता रोको, निवेदने, आमरण उपोषण केले आहेत. परंतु महापालिका प्रशासन यांच्याकडून फक्त लेखी स्वरुपात आश्वासन मिळते. परंतु प्रत्यक्ष कोणत्याही प्रकारची कारवाई होत नाही.

कल्याणरोड परिसरात 10-12 दिवसांनी पाणीपुरवठा होत असून तेही पूर्णदाबाने मिळत नाही. त्यामुळे नागरिकांचे हाल होत आहेत. 10 मार्च 2021 रोजी आमरण उपोषण केले होते. त्यावेळी मिळालेल्या लेखी आश्वसनापैकी 10 अश्व शक्तीची मोटार बसविण्यात आली.  परंतु त्याने कल्याण रोड परिसरासाठी काही फरक पडला नाही. 20 दिवस झाले तरी निविदा प्रक्रियाही झालेली नाही. कल्याण रोड परिसरात दिवसाआड पाणी पुरवठा करावा अन्यथा महापालिकेत आत्मदहन करण्याचा इशारा नगरसेवक सचिन शिंदे यांनी दिला आहे