अहमदनगर : छत्रपती शिवाजी महाराज युगपुरुष होते. त्यांनी प्रजेवर अन्याय अत्याचार करणार्‍यांचा चोख बंदोबस्त केला. नेहमी भावनेपेक्षा कर्तव्य श्रेष्ठ मानले, शक्ती पेक्षा युक्तीने कार्य केले. संपूर्ण आयुष्य प्रजेच्या कल्याणासाठी वाहिले. त्यांच्या विचाराने प्रेरित होऊन आपणही समाजात काम केले पाहिजे. समाजातील दुर्लक्षित दुर्बल घटकांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचे काम करावे. युवकांनी आपल्या शक्तीचा उपयोग समाजाच्या उन्नत्तीसाठी करावा, असे आवाहन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष सचिन डफळ यांनी केले.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्यावतीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त एस.टी. स्टॅण्ड येथील त्यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी जिल्हाध्यक्ष सचिन डफळ, सचिव नितीन भुतारे, शहराध्यक्ष गजेंद्र राशीनकर, अ‍ॅड.अनिता दिघे, मनोज राऊत, अशोक दातरंगे, डॉ.संतोष साळवे, संकेत व्यवहारे, अशोक तुपे, आदेश सत्रे, गणेश शिंदे, इंजि.विनोद काकडे आदि उपस्थित होते.

याप्रसंगी नितीन भुतारे म्हणाले,  छत्रपती शिवाजी महाराज हे आपल्या अलौकिक गुणांमुळे व बुद्धिमत्तेमुळे आतापर्यंतच्या सर्व पिढ्यांचे आदर्श ठरलेले आहेत. त्यांचे जीवनकार्याचा सर्वांनी बारकाईने अभ्यास केला पाहिजे.   स्वराज्याचे रक्षक असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास पुढील पिढीच्याही कायम स्मरणात राहिल, असेच कार्य त्यांनी केले आहे. याप्रसंगी गजेंद्र राशीनकर, अ‍ॅड.अनिता दिघे यांनीही छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवन कार्याची माहिती उपस्थितांना दिली.