
अहमदनगर शहर जिल्हा काँग्रेसच्या वतीने पिल्ले कुटुंबीयांचे सांत्वन
अहमदनगर (प्रतिनिधी) : काँग्रेसचे ज्येष्ठ कार्यकर्ते, भिंगार ब्लॉक काँग्रेसचे अध्यक्ष स्व.आर. आर. पिल्ले यांनी भिंगार मध्ये काँग्रेसला जिवंत ठेवण्याचे काम केले. पक्षाला घराघरात त्यांनी पोचविले. कोरोना संसर्गामुळे स्व. पिल्ले यांचे अकाली आपल्यातून जाणे हे काँग्रेस पक्षासाठी अत्यंत दुःखद असून त्यांच्या जाण्याने समाजात, काँग्रेस पक्षात कधीही न भरून येणारी पोकळी निर्माण झाली असल्याचे प्रतिपादन शहर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी केले आहे.पिल्ले कुटुंबियांचे शहर जिल्हा काँग्रेसच्या पदाधिकाऱ् यांनी घरी भेट घेऊन सांत्वन केले. यावेळी काळे यांच्यासह काँग्रेसचे जिल्हा समन्वयक ज्ञानदेव वाफारे, ब्लॉक काँग्रेस अध्यक्ष मनोज गुंदेचा, शहर जिल्हा उपाध्यक्ष खलील सय्यद, उपाध्यक्ष अनंतराव गारदे, भिंगार काँग्रेसचे कॅ. रिजवान शेख, क्रीडा काँग्रेसचे अध्यक्ष प्रवीण गीते आदींसह काँग्रेस पदाधिकारी उपस्थित होते.
स्व.पिल्ले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून शहर जिल्हा काँग्रेस कमिटी, ग्रामीण जिल्हा काँग्रेस कमिटी, शहर ब्लॉक काँग्रेस कमिटी, भिंगार ब्लॉक काँग्रेस कमिटी, महसूल मंत्री ना.बाळासाहेब थोरात, आ.डॉ.सुधीर तांबे, युवक काँग्रेस प्रदेशाध्यक्ष सत्यजितदादा तांबे, पक्षाच्या विविध फ्रंटल, आघाड्या, सेल यांच्या वतीने श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी स्व. पिल्ले यांचे ज्येष्ठ बंधू गोपाल पिल्ले, चिरंजीव शुभम पिल्ले उपस्थित होते.
यावेळी भावना व्यक्त करताना किरण काळे म्हणाले की, पिल्ले यांनी अनेक वर्ष भिंगारचे अध्यक्षपद भूषविले. कॅन्टोन्मेंट बोर्डाचे उपाध्यक्ष म्हणून देखील काम करायची संधी त्यांना मिळाली. पक्षाच्या संकट काळात ते कायम सोबत राहिले. ते पक्षाचे निष्ठावान कार्यकर्ते होते. पक्षावर निस्सीम प्रेम करणारे ज्येष्ठ सहकारी मार्गदर्शक अचानक गेल्याने आमच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
काँग्रेस पक्ष पिल्ले कुटुंबियांच्या दुःखात सहभागी आहे : मनोज गुंदेचा
मनोज गुंदेचा म्हणाले की, काँग्रेस पक्ष पिल्ले कुटुंबियांच्या दुःखात सहभागी आहे. नुकताच ना. बाळासाहेब थोरातांचा दौरा झाला. स्व.पिल्ले यांचे कोरोनाने निधन झाले हे सर्वांना ज्ञात आहेच. परंतु त्यांच्या कुटुंबातील काही व्यक्ती देखील दुर्देवाने कोरोनाने बाधित होत्या. ना.थोरात यांचा दौरा होण्यापूर्वी काही दिवस आधी त्यांचा कोरोना चाचणी अहवाल निगेटिव्ह आला होता. मात्र अहवाल आल्यानंतर देखील सुमारे आठ-दहा दिवसांचा कॉरनटाईन कालावधी असतो. ही बाब लक्षात घेता ना. बाळासाहेब थोरात यांची स्वतःची व पक्षाची इच्छा असून देखील पिल्ले कुटुंबीयांच्या आरोग्याच्या दृष्टीने त्यांच्या घरी अशा वेळी सांत्वनासाठी जाणे योग्य नव्हते. त्यामुळे हा कालावधी संपल्यानंतर कुटुंबीयांची भेट घेणे उचित आहे अशी भावना पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली होती, असे यावेळी मनोज गुंदेचा म्हणाले.
