अहमदनगर : सोशल मीडियाच्या माध्यमातून काँग्रेस पक्षाची ध्येयधोरणे, संघटनेच्या वतीने लोकांची केलेली कामे, सरकारच्या माध्यमातून लोकांचे मार्गी लावण्यात आलेले प्रश्न आदी बाबींची माहिती लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी नगर शहरामध्ये काँग्रेसच्या वतीने मी गांधी दूत अभियानाचे लॉन्चिंग शहर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष किरण काळे यांच्या हस्ते करण्यात आले आहे. या माध्यमातून शहरात 300 सोशल मीडिया वॉरियर्सची टीम उभी केली जाणार असल्याचे प्रतिपादन काळे यांनी केले आहे.

यावेळी ब्लॉक काँग्रेसचे अध्यक्ष मनोज गुंदेचा, सोशल मीडिया विभागाचे शहर जिल्हाध्यक्ष सौरभ रणदिवे, शहर जिल्हा उपाध्यक्ष निजाम जहागिरदार, शहर जिल्हा सचिव अन्वर सय्यद, भिंगार काँग्रेसचे कॅ.रिजवान शेख आदींसह पदाधिकारी उपस्थित होते.

आ. नाना पटोले यांची प्रदेशाध्यक्षपदी निवड झाल्यानंतर त्यांनी हे अभियान राज्यभर राबवण्याचा निर्णय घेतला आहे. अहमदनगर शहरामध्ये देखील शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने या अभियानाची अंमलबजावणी महसूल मंत्री ना.बाळासाहेब थोरात, आ. डॉ. सुधीर तांबे, युवक प्रदेशाध्यक्ष सत्यजितदादा तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि किरण काळे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात येणार आहे.

या अभियानाच्या अंमलबजावणीची जबाबदारी अहमदनगर शहर सोशल मीडिया विभागाचे शहर जिल्हाध्यक्ष सौरभ रणदिवे यांच्यावर सोपविण्यात आली आहे. उत्तर महाराष्ट्राचे सोशल मीडिया विभाग प्रमुख ज्ञानेश्वर चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली सोशल मीडियाची शहरातली काँग्रेसची टीम यासाठी काम करत आहे.

अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या वतीने मी गांधी दूत या अभियानामध्ये गांधी दूत होण्यासाठी सोशल मीडियाच्या माध्यमातून नोंदणीसाठी मोठ्या प्रमाणावर लिंक व्हायरल करण्यात येत आहे. काँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्यासह काँग्रेस विचारावर प्रेम असणार्‍या नागरिकांना या लिंक वर जाऊन आपले नाव नोंदविता येणार आहे.

या अभियानाच्या माध्यमातून नगर शहरामध्ये पहिल्या टप्प्यात 300 सोशल मीडिया वॉरियर्सची टीम उभी करण्यातचे काम शहरात सुरू झाले आहे. या वॉरीयर्सना राज्य तसेच ऑल इंडिया काँग्रेस कमिटीच्या वतीने वेळोवेळी मार्गदर्शन करण्यात येणार आहे. यातील निवडक सोशल मीडिया वॉरियर्सना शहर काँग्रेस सोशल मीडिया विभागाच्या माध्यमातून प्रशिक्षण देणार देण्यात येणार असल्याची माहिती सोशल मीडिया विभाग शहर जिल्हाध्यक्ष सौरभ रणदिवे यांनी दिली आहे.