अहमदनगर – अहमदनगर जिल्ह्यातील दहावी व बारावी सोडून सर्व वर्गाच्या शाळा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. उद्या दि. 30 मार्चपासून हा निर्णय लागू करण्यात येणार आहे. तर दहावी आणि बारावीच्या परिक्षा असल्याने त्यांच्या शाळा सुरू राहणार आहेत. पालकमंत्री हसन मुश्रीफ जिल्हा दौर्‍यावर आले असता आयोजित पत्रकार परिषदेत जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले बोलत होते.

यावेळी पालकमंत्री हसन मुश्रीफ, जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले, जिल्हा पोलिस अधीक्षक मनोज पाटील, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र क्षिरसागर, महापालिकेचे आयुक्त शंकर गोरे आदी उपस्थित होते.

केंद्र सरकारने बाकीच्या देशांना लस देण्यापेक्षा आपल्या देशाला लस द्यावी. तसेच लसीकरणासाठी केंद्र सरकारने वयाची अट काढून टाकावी, लसीकरण बंधनकारक करावे अशी मागणी ना. मुश्रीफ यांनी केली आहे. लॉकडाऊनबाबत राज्य सरकारने अद्याप निर्णय घेतलेला नसून नगर जिल्ह्यात राज्य शासनाच्या सुचनेनुसार विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. जिल्ह्यात रेमडिसीवरचा साठा कमी असून लवकरात लवकर हा साठा मिळण्याबाबत पाठपुरावा सुरु असल्याचे त्यांनी सांगितले.

जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भोसले यांनी करोना प्रतिबंध उपाययोजनांबाबत सांगितले की, दहावी व बारावी वगळता सर्व शाळा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीत गर्दी टाळण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. जिल्ह्यातील सर्व हॉटेल, रेस्टॉरंट रात्री आठनंतर पूर्ण बंद राहणार असून यावेळी पार्सल सुविधा देखील बंद ठेवण्यात येणार आहेत.

पालकमंत्री मुश्रीफ म्हणाले, लोकांच्या मनातली कोरोनाची भिती गेली असुन लोक कोरोनाला घाबरत नाहीत. तसेच जास्तीत जास्त आयसोलेशनला परवानगी द्यायची नाही असा प्रशासनाने निर्णय घेतला आहे. कोविडचा प्रादुर्भाव लक्षात घेवून पुढील 100 दिवसांचे नियोजन करण्यात आले आहे.