
पुणे – महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) रविवारी होणाऱ्या राज्य सेवा पूर्व परीक्षेसाठी जिल्हा प्रशासनाकडून तयारी पूर्ण करण्यात आली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर परीक्षेसाठी नेमण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांची आरटीपीसीआर चाचणी करण्यात येणार आहे. या संदर्भात निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. जयश्री कटारे म्हणाल्या, जिल्ह्यात ७७ केंद्रांवर ही परीक्षा होणार असून, या परीक्षेची तयारी पूर्ण करण्यात आली आहे. या परीक्षेसाठी सुमारे ३१ हजार उमेदवार असतील. केंद्रांवर नेमलेल्या सुमारे दोन हजार सातशे कर्मचारी आणि पर्यवेक्षकांच्या आरटीपीसीआर चाचण्या करण्यात येत आहेत.महापालिकेच्या केंद्रांवर या कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणी करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.सुमारे बाराशे कर्मचाऱ्यांच्या चाचण्या पूर्ण झाल्या आहेत. उर्वरित कर्मचाऱ्यांच्या चाचण्या पूर्ण करण्यात येतील. प्रत्येक परीक्षा केंद्रावर कोरोना प्रतिबंधक उपाययोजना करण्यासाठी खासगी एजन्सी नेमण्यात आली आहे. त्यांच्याकडून उमेदवारांच्या शरीराचे तापमान तपासून सॅनिटायझेशन करण्यात येणार आहे.
