
अहमदनगर- पत्नीच्या अंगावर ऑसिड टाकून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी पतीस दहा वर्ष सक्तमजुरी व 50 हजार रुपये दंडाची शिक्षा न्यायालयाने सुनावली आहे. सरकारी पक्षाच्या वतीने विशेष सरकारी वकील मनिषा पी केळगंद्रे-शिंदे यांनी कामकाज पाहिले. खटल्याच्या सुनावणी दरम्यान पैरवी अधिकारी पो.हे.काॅ मारुती ए थोरात यांनी सहकार्य केले.
फिर्यादी पिडितेस जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी जिल्हा व सत्र न्यायाधीश अशोककुमार भिलारे यांनी आरोपी श्रीकांत आनंद मोरे (रा.प्रबुद्धनगर, आलमगीर, भिंगार, अहमदनगर) यास भादविक 307, 326 अ, 341 प्रमाणे दोषी धरले. आरोपी मोरे याला भादवि कलम 307 प्रमाणे 10 सक्तमजुरी व 50 हजार रुपये दंड व दंड न भरल्यास 6 महिने साधी कैद, भादवि कलम 341 प्रमाणे 1 महिना सक्तमजुरी व 500 रुपये दंड व दंड न भरल्यास 15 दिवस साधी कैद अशी शिक्षा ठोठावली. तसेच दंडाच्या रक्कमेपैकी 40 हजार रुपये पिडीतेस देण्याचा व उर्वरित दंड सरकार जमा करण्याचे आदेश न्यायालयाने पारीत केला आहे.
