मुंबई : मुकेश अंबानी यांच्या अँटिलीया बाहेर स्फोटकांसह पार्क झालेल्या स्कॉर्पिओ प्रकरणी एनआयएने शनिवारी रात्री उशिरा सहायक पोलिस निरीक्षक सचिन वाझे यांना अटक केली. रविवारी त्यांना एनआयएच्या विशेष न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी न्यायालयाने त्यांना २५ मार्चपर्यंत एनआयए कोठडी सुनावली. वाझे यांना १४ दिवसांची कोठडी सुनावण्यात यावी, अशी मागणी एनआयएच्या वतीने करण्यात आली.

न्यायालयाने त्‍यांना २५ मार्चपर्यंत कोठडी सुनावली.आता पुढील दहा दिवस मनसुख हिरेन हत्याप्रकरणी एनआयएला सखोल तपास करणे शक़्य होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.सचिन वाझे १९९० च्या बॅचचे अधिकारी आहेत. त्यांनी आतापर्यंत ६३ एन्काऊंटर केले आहेत. मुंबईतील घाटकोपर बस बॉम्बस्फोटाचा आरोपी ख्वाजा युनूसचा पोलिस कोठडीत मृत्यू झाला होता. या प्रकरणात काही पोलिसांवर हत्या आणि पुरावे नष्ट केल्याचा आरोप झाला त्यामध्ये सचिन वाझे यांचाही समावेश होता. दरम्यान, सचिन वाझे यांच्यासह कॉन्स्टेबल राजेंद्र तिवारी,सुनील देसाई आणि राजाराम निकम यांना पुन्हा सेवेत रुजू करण्यात आले आहे. त्या प्रकरणात त्यांना 2004 मध्ये निलंबितही करण्यात आले होते.२००७ मध्ये त्यांनी राजीनामा दिला, मात्र तपास सुरु असल्याने तो मंजूर करण्यात आला नव्हता. त्यानंतर 2008 च्या दसरा मेळाव्यात ते शिवसेनेत दाखल झाले.

मनसुख हिरेन यांच्या मृत्यू प्रकरणात वादग्रस्त ठरलेले व चौकशीच्या फेऱ्यात अडकलेले वाझे अटक टाळण्यासाठी शनिवारी सकाळपासून प्रयत्न करत होते. ठाणे न्यायालयात अंतरिम व अटकपूर्व असे दोन अर्ज त्यांनी दाखल केले. त्यापैकी अंतरिम जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला. त्यांच्या अटकपूर्व जामिनाची सुनावणी न्यायालयाने 19 मार्चला निश्चित केली. याच दरम्यान शनिवारी सकाळी 11.30 वाजता सचिन वाझे एनआयए कार्यालयात आपला जबाब नोंदवण्यासाठी हजर झाले. रात्री 11 वाजून 55 मिनिटांनी त्यांना अटक करण्यात आल्याचे एनआयएने जाहीर केले.

अंबानींच्या घराबाहेर स्फोटकांसह पार्क झालेल्या स्कॉर्पिओशी वाझे यांचा संबंध असल्याचा आरोप एनआयएने ठेवल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले होते.मुंबई पोलिस दलातील सर्वच महत्त्वाच्या प्रकरणांचे तपास अधिकारी असलेल्या सहायक पोलिस निरीक्षक सचिन वाझे यांची आतापर्यंतची कारकीर्द वादग्रस्तच ठरली आहे. 1990 च्या पोलिस उपनिरीक्षक तुकडीतील वाझे यांनी आपली कारकीर्द गडचिरोलीतून सुरू केली. ठाणे पोलिस दल आणि त्यानंतर मुंबई पोलिस दलात चांगली कामगिरी करत ते चकमक फेम अधिकारी ठरले. एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा हे त्याकाळातील सचिन वाझे यांचे बॉस त्यांच्याच मार्गदर्शनाखाली चकमकी मध्ये सचिन वाझे तयार झाले असे म्हटले जाते.

सचिन वाझे यांच्या नावावर 63 एन्काऊंटरची नोंद असून, छोटा राजन आणि दाऊद इब्राहिमच्या अनेक गुंडांचा त्यांनी खात्मा केला. 2002 घाटकोपर बॉम्बस्फोटातील आरोपी ख्वाजा युनूस याच्या संशयास्पद कोठडीतील मृत्यू प्रकरणी आरोपात सचीन वाझेंसह 14 पोलिसांना 2004 मध्ये निलंबित करण्यात आले होते. 2007 मध्ये सचिन वाझे यांनी यामुळेच पोलीस दलाचा राजीनामा दिला असे समजते आणि राजीनामा दिल्यानंन्तर पुढच्या वर्षीच शिवसेनेत प्रवेश केला.त्यानंतर मात्र 13 वर्षांनंतर 06 जून 2020 रोजी ते पुन्हा पोलीस दलात परतले. त्यांना गुन्हेशाखेतील गुप्तवार्ता विभागाची जबाबदारी देण्यात आली होती परंतु याठिकाणी 1 वर्ष होण्या आधीच त्यांच्यावर या नव्या प्रकरणात त्यांचे नाव समोर आले आणि संशयाचे ढग वाढत चालले आता हकीकत काय हे एनआयए तपासाअंती स्पष्ट होईल.