अहमदनगर (दि ८ मार्च २०२१) आयुष्यात स्वत:ची तब्येत, स्वत:चे आरोग्य नीट ठेवणे हे प्रत्येक महिलेचे आद्यकर्तव्य आहे. सर्व क्षेत्रात महिलांनी आज स्वत:ला सिद्ध केले आहे. अधिकार मिळाले आहेत पण ते गाजवायचे नाहीत तर राबवायचे आहेत. महिला दिन म्हणजे स्त्री स्वातंत्र्य, स्त्री सक्षमता, महिला सक्षमीकरण याबरोबरच कुटुंबव्यवस्था सक्षमीकरण व्हायला हवे, असे प्रतिपादन सामाजिक कार्यकर्त्या तथा स्वच्छता दूत शारदा होशिंग यांनी केले.प्रयास व नम्रता दादी-नानी ग्रुप आयोजित महिला दिनाच्या कार्यक्रमात होशिंग अध्यक्षस्थानावरून बोलत होत्या. यावेळी ग्राफॉलॉजी, न्यूमरॉलॉजी, सिग्नेचर अ‍ॅनॉलिसिस विषयातील मार्गदर्शिका दीपा सांवला उपस्थित होत्या.

पुढे बोलताना होशिंग म्हणाल्या की, कुटुंब सक्षमीकरणामध्ये स्त्रीची भूमिका आणि तिचा वाटा सिंहाचा आहे. सद्यस्थितीत कुटुंबव्यवस्थेला कुठेतरी तडा जातोय. कुटुंबव्यवस्था सक्षम नाहीये. कुटुंबव्यवस्थेतील तीन महत्त्वाचे घटक सासू, सून व मुलगी या तिघींचेही एकेकींमध्ये असणारे बंध अधिक दृढ व्हायला हवेत, तरच भारतीय संस्कृती व कुटुंबव्यवस्था सुदृढ होऊ शकणार असल्याचे त्यांनी सांगितले.प्रुमुख पाहुण्या दीपा सांवला यांनी आपण करीत असलेल्या ग्राफॉलॉजी, न्यूमरॉलॉजी, सिग्नेचर अ‍ॅनॉलिसिसबद्दल माहिती दिली. हस्ताक्षरावरून व्यक्तीचा स्वभाव, त्याच्या अडचणी, निराशा, आजारपण, नातेसंबंध, करिअर, व्यवसाय आदींबाबत माहिती कशी ओळखली जाते याबद्दल सांगितले.

पेन पकडण्याच्या सवयीवरून मेंदूतील घडामोडी तसेच सही करण्याच्या पद्धतीवरून आपल्यातील कंपने याबद्दल सुमारे 15 मिनिटे महिलांना त्यांनी माहिती दिली. न्यूमरॉलॉजीबद्दल सांवला म्हणाल्या की, मानवाच्या जीवनपद्धतीत आकड्यांचे महत्त्व अनन्यसाधारण असते. भिंतीवरील कॅलेंडर, गाडी क्रमांक, मोबाईल फोन क्रमांक, टीव्ही चॅनेल क्रमांक याच्याशी आपला दिवसातून अनेकवेळा संबंध येतो. जन्मतारखेवरून आपले प्रश्‍न, अडचणी कशा सोडवाव्यात, याबद्दल त्यांनी मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाच्या प्रारंभी प्रयासच्या दिवंगत सदस्या स्व.कुुमुदिनी जोशी तसेच स्व. विजया बोरा यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. पाहुण्यांचे स्वागत व सत्कार अध्यक्षा अलका मुंदडा यांनी भेटवस्तु देऊन केला. यावेळी झालेल्या विविध बौद्धिक गेमचे प्रतिनिधित्व दीप्ती मुंदडा यांनी केले. गेममध्ये विजया मेहता, जयश्री पुरोहित, सविता गांधी, संगीता गांधी, सीमा केदारे यांनी पारितोषिके पटकावली.

पारितोषिकांचे प्रायोजकत्व मॅचवेलच्या संचालिका सरस पितळे यांनी स्वीकारले होते. उपाध्यक्षा अनिता काळे यांनी प्रास्ताविक केले.नीता माने यांनी सूत्रसंचालन केले. शोभा पोखरणा यांनी आभार मानले. दत्तकृपा हॉटेलचे संचालक मयूर विधाते यांनी उपस्थितांसाठी अल्पोपहाराची व्यवस्था केली होती. कार्यक्रास शकुंतला जाधव, ज्योती कानडे, ज्योतिषतज्ज्ञ अभिलाषा, वैशाली ससे, चंद्रकला सुरपुरिया, शशिकला झरेकर आदींसह महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.