
लॉकडाऊन करण्याचा निर्णय एकट्याने घ्यायचा नसतो याबाबत जे काही निर्णय होईल ते बैठकीनंतर
औरंगाबाद : शहरातील कोरोना रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असल्याने पुढच्या आठवड्यात म्हणजेच सोमवार किंवा मंगळवारपासून लॉकडाऊन लावण्यात येणार असल्याची चर्चा सुरु आहे. यावर औरंगाबादचे जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी खुलासा केला आहे.मी रविवारी रुजू होईन. रविवारी संध्याकाळी माझ्या निवासस्थानी मनपा, पोलीस प्रमुखाची बैठक होईल. लोकांच्या डोक्यात दगड घातल्याप्रमाणे निर्णय होणार नाही. लॉकडाऊन करण्याचा निर्णय एकट्याने घ्यायचा नसतो. याबाबत जे काही होईल, ते बैठकीनंतर होईल. लोकांना त्रास होईल असा कोणताही निर्णय घेतला जाणार नाही. पूर्ण संसर्ग किती वाढला आहे, त्याचे मूल्यांकन होईल.

यानंतर लॉकडाऊन करायचे की नाही, याबाबत जिल्हा आपत्ती निवारण प्रमुख म्हणून मी जाहीर करेन,” असे जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी म्हटले आहे.औरंगाबाद जिल्ह्यात पुन्हा एकदा कोरोनाचा उद्रेक होताना दिसून येत आहे. कोरोना रुग्णसंख्येने शुक्रवारी तब्बल चारशेचा आकडा ओलांडला असून, ४५९ नवे रुग्ण दिवसभरात आढळले, तर ५ बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. दिवसभरात १७९ जणांचे उपचार पूर्ण झाल्याने त्यांना विविध रुग्णालयांतून सुटी देण्यात आली असून २९१० रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
