अहमदनगर ः पारनेर न्यायालयाने काल फरार घोषित केलेल्या रेखा जरे हत्याप्रकरणातील मुख्य आरोपी बाळ बोठे याचा तपास करण्यात पोलीस यंत्रणा अपयशी ठरल्याच्या निषेधार्थ आता रेखा जरे यांच्या मुलाने उपोषणाचं हत्यार उपसलं आहे. रुणाल जरे याने पोलिसांच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह निर्माण करत, अहमदनगरच्या पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरु केलं आहे. बाळ बोठेला तातडीने अटक करा अशी मागणी रुणाल जरे याने केली आहे.

काही दिवसांपूर्वी रूनाल जरे याने जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील व जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांना निवेदन देऊन 5 मार्चला उपोषण करण्याचा इशारा दिला होता.या प्रकरणातील अन्य 5 आरोपींना पोलिसांनी अटक करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले आहे. अन्य आरोपीस पोलिस तातडीने गजाआड करू शकतात तर मग मुख्य आरोपी बोठे पोलिसांना का सापडू शकत नाही? हा रूणाल जरेचा प्रश्न आहे. पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी बोठे बाबत बरीच माहिती पोलिसांना प्राप्त झाली आहे. त्याला लवकरच अटक केली जाईल असे आश्वासन जरे कुटुंबीयांना दिले होते. पण 90 दिवस उलटून गेले तरी बोठे पोलिसांना का सापडत नाही? बोठेला कोणाचे पाठबळ आहे. बोठेचे तपासकामात हलगर्जीपणा झाला आहे का? असे अनेक प्रश्न रूणाल जरे याने पोलीस अधीक्षक व जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात उपस्थित केले आहेत. पण या प्रश्नांची उत्तरे कोणाकडेच नाहीत.

अनेक महत्त्वाच्या गुन्ह्याची उकल करणारा गुन्हे अन्वेशन विभाग बोठेच्या तपास कामी हतबल का झाला? बोठेला कोण पाठीशी घालतय? न्यायालयाकडे पोलीस प्रशासन बोठेचे अकाउंट सील करण्याबाबत तसेच मालमत्ता जप्त करण्याचे आदेश मागतील तेव्हा तरी बोठे आत्मसमर्पण करील की फरारच राहील याबाबत जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले आहे. रूणाल जरेचे आजच्या उपोषणामुळे बोठेचा तपास अधिक जलदपणे सुरु होईल की तो फरारच राहील या प्रश्नाच उत्तर कोणाकडच नाही.