अहमदनगर – ‘स्थायी’ची निवडणूक लढविण्याचा निर्णय शिवसेनेच्या शहरातील नेत्यांनी घेतला होता पण राज्यस्तरीय शिवसेना नेत्यांनी आज या निवडणुकीतून माघार घेण्याचे आदेश दिले. यानंतर शिवसेनेचे स्थायीचे उमेदवार विजय पठारे यांनी अर्ज माघारी घेतला.व पीठासीन अधिकारी राजेंद्र भोसले यांनी अविनाश घुले यांची स्थायीच्या सभापती पदावर बिनविरोध निवड झाल्याचे जाहीर केले. मुंबई आणि विधानसभेचे कामकाजातील मध्ये हॊणाऱ्या चहा पानाच्या कार्यक्रमात झालेल्या राज्यस्तरीय बैठकीत अहमदनगर मनपा स्थायी समितीच्या शिवसेनेच्या उमेदवारास अर्ज मागे घेण्याचे आदेश आले आणि पुन्हा सिद्ध झाले कि कोणीही राजकीय पक्ष शत्रूही नसतो आणि कितीही जवळचा असला तर मित्रही नसतो. भाजप-राष्ट्रवादी युती महाविकास आघाडीला अहमदनगर स्थायी पदापासून दूर ठेवण्यात यशस्वी झाली आणि भाजप-राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी एकच जल्लोष केला.

    पीठासीन अधिकारी जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांचे उपस्थितीत आज 3 वाजता स्थायी समिती सभापती पदासाठी निवडणूक प्रक्रिया सुरुवात झाली. स्थायी समिती सभापती पदाचे उमेदवार अविनाश घुले तीन वाजता सभागृहात आले. त्यांचे समवेत भाजपाचे सोनाबाई शिंदे, मनोज कोतकर, वंदना ताठे, रवींद्र बारस्कर राष्ट्रवादी काँग्रेसचे समद खान, प्रकाश भागानगरे, सागर बोरुडे, परवीन कुरेशी काँग्रेसच्या सुप्रिया जाधव बसपाचे मुदस्सर शेख यांनी सभागृहात प्रवेश केला.

शिवसेनेचे 3 नगरसेवक शाम नळकांडे, सचिन शिंदे व परशुराम गायकवाड सभागृहात अनुपस्थित राहिले. त्याच वेळी सेनेने या निवडणुकीतुन माघार घेतल्याचे स्पष्ट झाले.शिवसेनेचे स्थायीचे उमेदवार विजय पठारे व शिवसेनेच्या रिता भाकरे सभागृहात आले व पठारे यांनी या निवडणुकीत अर्ज माघारी घेत असल्याचे जाहीर केले. नवनिर्वाचीत स्थायी समिती सभापती अविनाश घुले यांना विजय पठारे व रिता भाकरे यांनी शुभेच्छा दिल्या व ते सभागृहातून निघून गेले. पीठासीन अधिकारी राजेंद्र भोसले यांनी अविनाश घुले यांचा एकच अर्ज राहिल्यामुळे त्यांची बिनविरोध निवड झाल्याचे जाहीर केले त्यावेळी भाजपा-राष्ट्रवादी-काँग्रेस युती नगरसेवकांनी एकच जल्लोष केला.