एक प्यार का नगमा है
मौजों की रवानी है
ज़िंदगी और कुछ भी नहीं
तेरी मेरी कहानी है

माझं अत्यंत आवडतं गाणं. गाण्याला अजोड उंचीवर नेऊन ठेवणारे लतादीदी आणि मुकेशजी. आणि संगीतकार लक्ष्मीकांत-प्यारेलाल. पण त्याचे गीतकार कोण, सध्या कुठे आहेत. काही माहित नव्हतं. जगाच्या विस्मृतीत गेलेला हा गीतकार संतोष आनंद. या व्यतिरिक्त त्यांनी कितीतरी सुंदर गाणी त्या काळात दिलीत. जसे कि:

मेघा रे मेघा रे…
तेरा साथ है जो मुझे क्या कमी है…
मोहब्बत है क्या चीज…

आपल्या कारकिर्दीत अनेक गाजलेल्या चित्रपटांसाठी गीत लिहिणाऱ्या संतोष आनंद यांना उत्कृष्ट गीतलेखनासाठी तब्बल दोनवेळा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला. पण पुढे दिवस फिरले. काळ कोणासाठी थांबतो? एकुलता एक मुलगा अत्यंत चांगल्या अधिकारीपदाच्या सरकारी नोकरीत होता. त्यावर अफरातफरीचे आरोप झाले. तब्बल २५० करोडपर्यंत आकडा गेला. अडकला. अखेर २०१४ साली यात गुंतलेल्या मोठमोठ्या अधिकाऱ्यांची नावे सुसाईड नोट मध्ये लिहून बायको आणि चार वर्षाच्या मुलीसमवेत रेल्वेखाली उडी मारली. छोटी मुलगी केवळ नशिबाने वाचली. तीच आता संतोष आनंद यांचा एकमेव आधार आहे “जिंदगी और कूछ भी नही, तेरी मेरी कहाणी है”. गाण्याच्या चित्रीकरणात सुद्धा चित्रपटाचा नायक (मनोजकुमार) पत्नीच्या निधनानंतर आपल्या एकुलत्या एका छोट्या मुलासमवेत हे गाणे गाताना दाखवलाय. आज त्याहूनही अधिक कसोटीची वेळ वयाच्या एक्क्याऐंशीव्या वर्षी गीतकार संतोष आनंद यांच्यावर आली आहे.

परवा इंडियन आयडॉलने प्रथमच त्यांना अनेकानेक वर्षांनी मंचावर आणले आणि हि त्यांची हि कहाणी ऐकून उपस्थित सर्वांच्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा वाहू लागल्या. नेहा कक्कर घळघळा रडली. तिने त्यांना पाच लाख रुपयांची भेट देऊ केली. पण आपण आयुष्यात कधी कुणाकडे काही मागितले नाही असे विनम्रपणे सांगताना संतोष आनंद भावूक झाले. अखेर “हि तुमच्या नातीने दिलेली भेट आहे असे समजा” असे म्हणून सद्गदित झालेल्या नेहा ने त्यांच्या डोक्यावरून हात फिरवत गायिले “जिंदगी और कूछ भी नही, तेरी मेरी…” पण यापुढे ती गाऊ शकली नाही.

हा व्हिडीओ जरूर पहा. अंतर्मुख करेल:
https://youtu.be/xO0AlIXuKu4

कुछ पाकर खोना है, कुछ खोकर पाना है
जीवन का मतलब तो, आना और जाना है

आँखों में समंदर है, आशाओं का पानी है
ज़िंदगी और कुछ भी नहीं, तेरी मेरी कहानी है…

आपल्या लेखणीने अजोड आणि अद्वितीय गोडीची गाणी लिहून आपल्या सर्वाच्या मनाला केवळ संतोष आणि अपार आनंद देणाऱ्या गीतकार संतोष आनंद यांना ईश्वर सुदृढ आयुष्य आणि यातून सावरायची शक्ती देवो हि सदिच्छा!

-अतुल