अहमदनगर (दि २४ फेब्रुवारी २०२१) : दिल्लीगेट रस्ता काँक्रीट असताना त्यावर डांबर टाकून दुरूस्त करण्यात येत असून, काँक्रीटवर डांबर टिकणार नसल्याने हे काम निकृष्ट आहे. याची चौकशी करण्याची मागणी नगरसेवक योगीराज गाडे यांनी केली आहे. महापालिका आयुक्तांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, की दिल्लीगेट रस्त्याच्या दुरूस्तीचे काम सध्या चालू आहे. तेथे अगोदरच काँक्रीटचा रस्ता आहे. त्यावरील खड्डे बुजविण्यासाठी डांबर टाकण्यात येत आहे. काँक्रीटवर डांबर टिकत नाही. असे असताना हे काम करणे म्हणजे जनतेच्या पैशाचा अपव्यय आहे. हे काम टिकणार नसून एका पावसात डांबर वाहून जाईल.असे निकृष्ट काम करणार्‍यांची चौकशी करण्यात यावी. तसेच कोणत्या निधीतून हे काम होत आहे, याची माहितीही देण्यात यावी, अशी मागणी नगरसेवक गाडे यांनी केली आहे.