सरकारी विमान वापरण्याच्या मुद्यावरुन सध्या राज्यपाल विरुद्ध ठाकरे सरकार असा वाद सध्या रंगतोय. मुंबई विमानतळावर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना गुरुवारी सरकारी विमानातून प्रवास करण्यास राज्य सरकारने परवानगी नाकारली. त्यानंतर विरोधी पक्ष भाजपाने या मुद्यावरुन ठाकरे सरकारवर जोरदार टीका केली. राज्यपालांचा हा अपमान असल्याचा आरोप भाजपने केला. मात्र याच मुद्द्यावरून सामनाच्या अग्रलेखातून राज्यपालांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले आहे. तर संजय राऊत यांनी ‘सामना’च्या अग्रलेखातून राज्यपाल आणि भाजपवर निशाणा साधला आहे. राज्यपालच काय, मुख्यमंत्र्यांनाही खासगी कामासाठी सरकारी विमान वापरता येणार नाही, असे शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामना अग्रलेखात म्हटले आहे.

मुख्यमंत्री कार्यालय नियमानेच वागले. यात राज्यपालांशी झगडा करण्याचा प्रश्न येतोच कुठे? महाराष्ट्राचे राज्यपाल हे सन्माननीय व्यक्ती आहेतच. पण ते ज्या पदावर सध्या विराजमान आहेत त्या पदाचा मान व प्रतिष्ठा राखण्याची जबाबदारी त्यांचीही तितकीच आहे. राज्यपालांना भारतीय जनता पक्षाच्या अजेंड्यावर नाचायला भाग पाडले जात आहे व त्यात राज्यपालांचेच अधःपतन सुरू असल्याची टीकाही सामनातून केली आहे.

राज्यपालच काय, मुख्यमंत्र्यांनाही खासगी कामासाठी सरकारी विमान वापरता येणार नाही

राज्यपालांचा हा दौरा खासगी स्वरूपाचा होता. त्यामुळे नियमाने सरकारी विमानाचा वापर करता येणार नाही, असे कळवूनही राज्यपाल विमानात बसले. राज्यपालच काय, मुख्यमंत्र्यांनाही खासगी कामासाठी सरकारी विमान वापरता येणार नाही. मुख्यमंत्री कार्यालय नियमानेच वागले. यात राज्यपालांशी झगडा करण्याचा प्रश्न येतोच पुठे? पण महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हा विमान-वाद वेगळ्याच हवेत उडवू लागले आहेत. राज्यपालांना विमान नाकारले हा सरकारचा अहंकार असल्याचा टोला फडणवीस यांनी मारला. भाजप नेत्यांच्या तोंडात अहंकाराची भाषा शोभत नाही. सध्या अहंकाराचे राजकारण कोण करीत आहे ते संपूर्ण देश जाणतोय. दिल्लीच्या सीमेवर दोनशे शेतकऱ्यांनी प्राणार्पण करूनही सरकार कृषी कायद्यांबाबत मागे हटायला तयार नाही. त्यास अहंकार नाही म्हणायचे तर काय? असा प्रश्न देखील सामनातून उपस्थित केला आहे.

विरोधी पक्ष आपटाआपटी करीत सरकारला धारेवर धरत असेल तर विरोधी पक्षाने पहिल्या धारेची मारून वचवच सुरू केली आहे असेच म्हणावे लागेल

आता ताज्या प्रकरणात श्रीमान राज्यपाल महोदय सरकारी विमानाच्या वापरावरून चर्चेत आले आहेत. राज्यपाल महोदयांना सरकारी विमान उडवत त्यांच्या स्वराज्यात म्हणजे डेहराडूनला जायचे होते. पण महाराष्ट्र सरकारने त्यांना विमान वापरण्यास परवानगी दिली नाही. राज्यपाल महोदय गुरुवारी सकाळी विमानात जाऊन बसले. पण उड्डाणाची परवानगीच नसल्यामुळे त्यांना खाली उतरावे लागले व प्रवासी विमानाने डेहराडून वगैरे भागात जावे लागले. आता या सर्व प्रकरणावरून राज्यातील प्रमुख विरोधी पक्ष आपटाआपटी करीत सरकारला धारेवर धरत असेल तर विरोधी पक्षाने पहिल्या धारेची मारून वचवच सुरू केली आहे असेच म्हणावे लागेल. राज्यपालांच्या कार्यालयाने विमान उडवण्याची परवानगी मागितली व एक दिवस आधीच सरकारने परवानगी नाकारूनही राजभवनाने राज्यपालांना विमानात नेऊन का बसवले? असा हटवादीपणा करण्याचे कारण काय? राज्यपालांचा हा दौरा खासगी स्वरूपाचा होता असेही सामनाच्या अग्रलेखात संजय राऊत म्हटले आहेत