
अहमदनगर (प्रतिनिधी) – अहमदनगर महानगर पालिकेच्या आयुक्तपदी शंकर गोरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.राज्य शासनाने आज शुक्रवारी गोरे यांच्या नियुक्तीचे आदेश काढले आहेत.गोरे हे चाळीसगाव नगरपरिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कार्यरत होते. प्रशासकीय कारणास्तव गोरे यांची चाळीसगावहून अहमदनगर महापालिकेचे आयुक्त म्हणून बदली करण्यात आली आहे. तत्कालीन आयुक्त श्रीकांत मायकलवार निवृत्त झाल्यानंतर जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांच्याकडे आयुक्तपदाचा पदभार होता. आता आयुक्त म्हणून गोरे यांची नियुक्ती झाली आहे. निवृत्तीच्या दिवशी अनेक फाईलींना सह्या मारून तातडीच्या मंजुरी आयुक्त मायकलवार यांच्या मार्फत देण्यात आल्या होत्या मात्र जिल्हाधिकाऱ्यांनी या मंजुऱ्या संदर्भात तक्रारी आल्यानंतर त्याला स्थगिती दिली होती. आता नवे आयुक्त गोरे त्यावर काय निर्णय घेणार,याकडे नगरकरांचे लक्ष लागून आहे.
