
“महाराष्ट्र सरकारने संविधानाचा, कायद्याचा सन्मान राखला. जेव्हा जेव्हा राज्यपालांना सरकारी कामासाठी कोणतंही हेलिकॉप्टर, विमान हवं असेल तेव्हा ते सरकारने उपलब्ध करुन दिलं आहे. कोश्यारी गोव्याचेही राज्यपाल आहेत. तिथे भाजपाचं सरकार आहे, थोडा भार त्यांच्यावरही टाकायला हवा. यामागे कोणतंही राजकारण, सुडाची भावना नाही. सरकारने नियम आणि कायद्याचं पालन केलं आहे. त्यामुळे भाजपाचा तीळपापड होण्याची गरज नाही. जर उद्धव ठाकरेंच्या जागी मित्रपक्षातील इतर कोणी मुख्यमंत्री असतं तर त्यांनीसुद्धा याच नियमाचं पालन केलं असतं,” असं संजय राऊत यांनी सांगितलं.
आतापर्यंतचं सर्वात अहंकारी सरकार असल्याच्या फडणवीसांच्या टीकेला उत्तर देताना ते म्हणाले की, “अरे बापरे…कोण कोणास म्हणाले ? असा प्रश्न असायचा. येथे अहंकाराचा प्रश्न कुठे येतो. नियम पाळणं अहंकार आहे का? ज्याप्रकारे कृषी कायद्यासंदर्भात केंद्र सरकार वागत आहे तो अहंकार नाही आणि नियमांचं पालन आहे तर मग राज्यपालांना नियमानुसार विमान मिळालं नाही हा अहंकार कसा असू शकतो?”.
कोविडचा विषय असेल तर राज्यपालांचं वय पाहता त्यांनी राजभवनाबाहेर पडणंच चुकीचं
“राज्यपालांचा आणि त्या पदाचा मान आणि प्रतिष्ठा राखण्याचं काम आम्ही करत असतो. आता राज्यपाल लोकनियुक्त सरकारचा आदर किती राखतात हे मला माहिती नाही,” असा टोला संजय राऊतांनी यावेळी लगावला. “खासगी विमान असुरक्षित आहेत असं कोणी सांगितलं? जर कोविडचा विषय असेल तर राज्यपालांचं वय पाहता त्यांनी राजभवनाबाहेर पडणंच चुकीचं आहे. त्यांनी राजभवनात राहणंच सुरक्षित आहे,” असा सल्ला त्यांनी दिला.
