
अहमदनगर : केंद्र सरकारच्या कामगारविरोधी धोरणाचा निषेध करण्यासाठी आयटकच्या वतीने सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयासमोर कामगार कोडची (संहिता) होळी करण्यात आली. तर कामगार विरोधी असलेला 29 सप्टेंबर 2020 रोजीचा औद्योगिक संबंध कायदा कोड रद्द करण्याची मागणी करण्यात आली. कामगार व शेतकरीविरोधी धोरण राबविणार्या केंद्रातील मोदी सरकारविरोधात घोषणा देण्यात आल्या. या आंदोलनात अॅड.कॉ. सुधीर टोकेकर, अंबादास दौंड, भैरवनाथ वाकळे, भारती न्यालपेल्ली, दीपक शिरसाठ, सतीश पवार, राजू नन्नवरे, संतोष ठोंबरे, सुरेश आदमाने आदी सहभागी झाले होते. श्रम सुधारणाच्या नावावर 44 कामगार कायदे रद्द करुन केंद्र सरकार चार कोड अंमलात आणू इच्छित आहे. त्यासाठी राज्यांना त्याच्या अंमलबजावणीच्या सूचना केंद्र सरकारने केल्या आहेत. कामगार कायदे रद्द करुन कामगारविरोधी धोरण राबविणार्या केंद्र सरकारच्या निषेधार्थ आयटकच्या वतीने देशव्यापी चार कोडच्या बिलाची होळी करण्यात आल्याचे संघटनेच्या वतीने स्पष्ट करण्यात आले. कॉ.भारती न्यालपेल्ली म्हणाल्या की, कामगारांनी आणि संघटनांनी वर्षानुवर्षे संघर्ष करून मिळवलेले कामगार कायद्यांचे संरक्षण केंद्रातील मोदी सरकारने एका झटक्यात संपवले आहे.
