
पुणे: शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर उच्चाधिकार समिती नियुक्त करण्याचे लेखी आश्वासन घेऊन आपले उपोषण स्थगित करणारे ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्यावर काँग्रेसचे नेते आणि माजी खासदार भालचंद्र मुंगेकर यांनी जोरदार टीकास्त्र सोडले आहे. अण्णा हजारे हे महाराष्ट्रातील हास्यास्पद व्यक्तिमत्व असल्याचे सांगत अण्णा म्हणजे महात्मा गांधी नव्हेत, असे वक्तव्य डॉ. मुणगेकर यांनी केले आहे. अण्णांचे बोलविते धनी आता समोर आले असून अण्णा अनरिलायबल( विश्वास न ठेवण्याजोगे) आणि मॅनेजेबल असल्याचा घणाघातही डॉ. मुणगेकर यांनी केला आहे.
डॉ. भालचंद्र मुणगेकर पुण्यात पत्रकार परिषदेत बोलत होते. या वेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रातील सरकारवर देखील टीकेचे प्रहार केले.
शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर उच्चाधिकार समिती नियुक्त करण्याचे लेखी आश्वासन घेऊन ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी आपले उपोषण स्थगित केले आहे. आपल्या पूर्वी केलेल्या आणि अजूनही प्रलंबित असलेल्या मागण्यांसाठी हजारे यांनी ३० जानेवारीपासून राळेगणसिद्धी येथे उपोषणाचा इशारा दिला होता. मात्र, त्याच्या एक दिवस आधीच केंद्रीय कृषी राज्यमंत्र्यांच्या उपस्थितीत आणि विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या मध्यस्थीमुळे तोडगा निघाला. त्यामुळे हे उपोषण अण्णांनी स्थगित करण्याचा निर्णय घेतला. त्यावर काँग्रेसचे नेते आणि माजी खासदार डॉ. भालचंद्र मुणगेकर यांनी टीका केली आहे. अण्णा हे हास्यास्पद व्यक्तीमत्व असल्याचे ते म्हणाले. इतकेच नाही तर अण्णा हे अविश्वासू प्रकारचे व्यक्तीमत्व असून ते मॅनेज होतात, असा गंभीर आरोपही त्यांनी पत्रकार परिषदेत केला.
