
अहमदनगर ः घरातून पळून गेलेल्या तरुणी, लहान मुले,मिसिंग, किडनॅपिंगच्या पोलीस प्रशासनाकडे आलेल्या नोंदी यासाठी राज्यभर राबविण्यात आलेली “ऑपरेशन मुस्कान मोहीम 26 जानेवारीपर्यंत राबविणार असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी दिली. जिल्ह्यामध्ये 200 लहान मुलांच्या अपहरणाचे गुन्हे दाखल असून त्यापैकी 77 बालकांचा शोध घेण्यात आला आहे. तसेच जिल्ह्यामध्ये एकूण 2301 व्यक्ती हरवलेल्या होत्या, त्यापैकी 1011 व्यक्तींचा शोध घेतलेला आहे.
1210 महिलांपैकी 621 व 1091 पुरुषांपैकी 390 जणांचा शोध घेण्यात आलेला आहे. बालके, महिला व पुरुष मिळून 1088 जणांचा शोध घेण्यात आला आहे. हा शोध घेताना रेकॉर्ड बाहेरील (पोलिसांकडे नोंद नसलेली) 47 मुले आढळून आली आहेत. त्यांना त्यांच्या पालकांच्या हवाली करण्यात आले आहे. कोणी घरातून स्वतःहून निघून गेले होते, तर कोणी घरात होणार्या त्रासाला कंटाळून बाहेर पडले होते तर काहींना विविध आमीषे दाखवत फुस लावून पळवून नेले होते.
पोलिसांच्या रेकॉर्डला यापैकी कोणाचीही हरवल्याची वा पळवल्याची (मिसिंग किंवा किडनॅप) नोंद दाखल नव्हती. पण पोलिसांनी मागील महिनाभरात राबवलेल्या ऑपरेशन मुस्कान विशेष शोध मोहिमेत अशा 47 बालकांचा शोध लागला व त्यांची विचारपूस करून त्यांच्या पालकांच्या हवाली केल्यावर बालके व पालकांच्या चेहर्यावर हसू पसरले. ऑपरेशन मुस्कान मोहीम राबवणार्या पथकांनाही हे दृश्य पाहून कृतकृत्य झाल्याचे समाधान लाभले.
पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांनी नोडल अधिकारी बाजीराव पोवार यांच्या नेतृत्वाखाली हेड कॉन्स्टेबल सोमनाथ कांबळे, महिला पोलिस हेड कॉन्स्टेबल अर्चना काळे, महिला पोलिस नाईक रीना म्हस्के व मोनाली घुटे, महिला पोलिस कॉन्स्टेबल छाया रांधवण व रुपाली लोहारे यांच्या विशेष पथकासह प्रत्येक पोलिस ठाण्यातील एक अधिकारी व दोन कर्मचार्यांची पथके नियुक्त केली होती. या सर्वांनी मिळून एकूण हरवलेल्या व्यक्तींच्या दाखल 2301 प्रकरणांमध्ये शोध मोहीम राबवून 1011 व्यक्तींचा शोध लावला. सुमारे 45 टक्के असलेले हे प्रमाण किमान 50 टक्क्याच्यावर जाण्यासाठी येत्या 26 जानेवारीपर्यंत ही ऑपरेशन मुस्कान मोहीम नगर जिल्ह्यात राबवली जाणार आहे.
