
अहमदनगर : शहरातील मंगलगेट येथील बौद्ध समाज मंदिराचे काम मागील चार वर्षांपासून अर्धवट अवस्थेत पडले आहे. आमदार, खासदार, महापौर आणि स्थानिक लोकप्रतिनिधी त्याकडे दुर्लक्ष करत असून दलित समाजाचा आतापर्यंत केवळ मतांपुरताच वापर करण्यात आला आहे, असा आरोप करत समाजमंदिराचे काम पूर्णत्वास जाण्यासंदर्भात जिल्हाधिकारी यांची भेट घेऊन पाठपुरावा करणार असल्याचे पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे जिल्हाध्यक्ष सुनील क्षेत्रे यांनी म्हटले आहे.
भीमा-कोरेगाव शौर्यदिनानिमित्त मंगलगेट येथे आयोजित अभिवादन सभेत क्षेत्रे बोलत होते. या समाजमंदिराचे काम महापालिकेच्या वतीने सुरू करण्यात आले होते.काम 50 टक्के पूर्ण झाल्यानंतर ते बंद पडले आहे. कामास निधी नाही ही महापालिकेची चूक आहे की शासनाची याबाबत जिल्हाधिकारी यांची भेट घेऊन विचारणा करणार आहे.दलित वस्तीतील कामे तातडीने पूर्ण व्हावीत ही समाजाची मागणी आहे. परंतु निधी मिळत नसल्याने कामे रेंगाळत आहेत.
समाजमंदिराचे काम पूर्ण झाल्यास गोरगरीब समाजातील विद्यार्थी,नागरिकांना त्याचा लाभ मिळेल. गोरगरिबांची विविध कार्ये येथे पार पडू शकतात. परंतु याकडे कोणीही लक्ष देण्यास तयार नाही. महापौरांना अनेकदा सांगितले. खासदार, आमदार येथे येऊन गेले. परंतु कामाबाबत काहीच प्रगती झाली नाही. दलित समाजाच्या उन्नतीसाठी अशी कामे तातडीने पूर्ण व्हावीत, अशी मागणी आहे.याबाबत आता जिल्हाधिकारी यांचीच भेट घेणार असल्याचे श्री. क्षेत्रे यांनी सांगितले.
यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. तसेच भीमा-कोरेगाव येथील विजयस्तंभाला अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमास गणेश भिंगारदिवे,बाळासाहेब भिंगारदिवे, अनिकेत शिंदे, पुलकेष भिंगारदिवे, राकेश वाघमारे, राजू साखरे, मुन्ना भिंगारदिवे, शिरीष पाटोळे, रोहित कांबळे, शुभम पाटोळे, नीलेश पाटोळे, सनी आगळे, सागर क्षेत्रे, आकाश सरोदे, प्रशांत पाटोळे, दिनेश पेटकर, सागर बनसोडे, अजय पाडळे, वत्सलाबाई कांबळे, लता भिंगारदिवे आदी उपस्थित होते.
