
अहमदनगर (दि २९ डिसेंबर २०२०) : केंद्र सरकारने कृषी विधयक शेतकर्यांच्या कल्याणासाठीच आणले आहे. त्यामुळे शेतकर्यांना फायदाच होणार आहे. परंतु फक्त विरोधाला विरोध म्हणून या कृषी विधेयकला विरोध करत आहेत. जर या विधेयकात काही त्रुटी असतील त्या सांगाव्यात, चर्चा करावी. केंद्र सरकार शेतकर्यांच्या पाठिशी आहे, त्यासाठी नुकतीच त्यांच्या हक्काची रक्कम त्यांच्या खात्यात जमा केली आहे. भाजपाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी शेतकरी व सर्वसामान्यांना केंद्र शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांची माहिती देण्याचे व त्या लाभार्थ्यांपर्यंत पोहचविण्याचे काम करावे. अहमदनगर शहरामध्ये भाजपाचे संघटन मजबूत होत आहे, कार्यकर्त्यांना एकसंघ ठेवून पक्षाची ध्येय धोरणे जनसामान्यापर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न करावेत. आपणास हवी ती मदत वरिष्ठ पातळीवरुन केली जाईल, असे आश्वासन माजी मंत्री आ.सुभाष देशमुख यांनी दिले.
माजी मंत्री आ.सुभाष देशमुख नगरमध्ये आले असता त्यांचा भाजपाचे शहर जिल्हाध्यक्ष भैय्या गंधे यांच्या निवासस्थानी स्वागत करुन सत्कार करण्यात आला. याप्रसंगी उपाध्यक्ष सचिन पारखी, मल्हार गंधे, ऋग्वेद गंधे, हुजेफा शेख आदि उपस्थित होते. यावेळी बोलतांना भैय्या गंधे म्हणाले, भाजपाच्यावतीने नगर शहरात विविध उपक्रम हाती घेण्यात आलेले आहेत. त्याद्वारे कार्यकर्त्यांचे मजबूत संघटन केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सरकार चांगले काम करत आहे. भाजपाच्या कार्यकर्त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हात बळकट करण्यासाठी प्रयत्न करावेत. भाजपाचे वरिष्ठ नेते व आ.सुभाष देशमुख अहमदनगरमध्ये विशेष लक्ष घालून ताकद देण्याचे काम करत आहेत. भविष्यात नगरमध्ये भाजपाची ताकद वाढलेली दिसेल, असा विश्वास भैय्या गंधे यांनी व्यक्त केला. याप्रसंगी आ.सुभाष देशमुख व भैय्या गंधे यांच्यात विविध विषयांवर चर्चा झाली.
