मुंबई दि २८ डिसेंबर २०२० : शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना ईडीकडून नोटीस धाडण्यात आली आहे. पीएमसी बँक घोटाळ्याप्रकरणी त्यांना चौकशीसाठी २९ डिसेंबरला हजर राहण्यास सांगण्यात आले आहे.वर्षा राऊत यांना मुंबईतील कार्यालयात (Enforcement Directorate) हजर राहण्यास सांगण्यात आले आहे. यापूर्वी त्यांना दोनवेळा नोटीस धाडण्यात आली होती. तथापि, त्यांनी प्रकृतीच्या कारणास्तव ईडीसमोर हजर होण्याचे टाळले होते, अशी माहिती संबंधित अधिकाऱ्यांनी दिली आहे.

वर्षा राऊत यांना मनी लाँड्रिंग कायद्यान्वये नोटीस पाठवण्यात आली आहे. दरम्यान, या नोटीशीनंतर संजय राऊत यांनी सोशल मीडियातून सूचक प्रतिक्रिया दिली आहे.त्यांनी ट्विट करत म्हटले आहे की, आ देखे जरा किसमे कितना है दम, जमके रखना कदम मेरे साथिया.संजय राऊत यांचे निकटवर्तीय प्रवीण राऊत यांना काही दिवसांपूर्वी ईडीने अटक केली होती. पीएमसी बँकेतील वर्षा राऊत यांच्या खात्यात प्रवीण राऊत यांच्या खात्यातून काही व्यवहार झाले होते. या खात्यात सुमारे 50 लाख रुपयांची उलाढाल झाल्याचे ईडीच्या निदर्शनास आल्याचे कळते. त्यासाठीच वर्षा राऊत यांना कलम 67 अंतर्गत ही नोटीस बजावण्यात आली आहे, असे ईडीच्या सूत्रांनी सांगितले.

संजय राऊत यांनी राज्यसभा निवडणुकीचा अर्ज भरताना दिलेल्या प्रतिज्ञापत्रातही वर्षा राऊत यांच्या खात्यात प्रवीण राऊत यांच्या खात्यातून कर्जासाठी काही रक्कम घेण्यात आल्याचा उल्लेख असून यासंबंधीची माहिती ईडीला जाणून घ्यायची आहे, त्यासाठी वर्षा राऊत यांची चौकशी केली जाणार आहे.