अहमदनगर (दि २४ डिसेंबर २०२०) : गेल्या तीन वर्षापासून विचारधारा 3 जानेवारी रोजी सावित्री उत्सव राष्ट्रीयसण म्हणून साजरा करीत आहे. काल राज्य मंत्री मंडळाने दि. 3 जानेवारी हा महिला शिक्षण दिन म्हणून जाहीर केला आहे. या निमित्ताने 2021 पासून उत्सवात शैक्षणिक क्षेत्रात कार्य करणार्‍या 5 महिलांचा सावित्री फातिमा पुरस्काराने सन्मान करणार असल्याची माहिती विचारधाराचे अध्यक्ष विठ्ठल बुलबुले, जिज्ञासाच्या संचालिका संगीताताई गाडेकर यांनी दिली आहे.

आजच्या स्त्रिया प्रगल्भ आणि प्रगतशील दिसत आहेत. त्याचे मूळ क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी त्या काळात बहुजनांच्या शिक्षणासाठी ज्या खस्ता खाल्या अंगावर शेण दगड झेलल्या, मनाला बोचणार्‍या शिव्याशाप खाल्या तरी मुलींनी शिकावे त्यांनी प्रगल्भ व्हावे म्हणून झटल्या, त्यासाठी अपर मेहनत घेतली म्हणून आज स्त्रियांनी घरातील माजघरा पासून ते आकाशातील विमान उडाण करण्यापर्यंत मजल गाठली म्हणून सावित्रीबाई फुले यांच्या बद्दल कृतज्ञाता व्यक्त करण्यासाठी राष्ट्र सेवादल आणि विविध पुरोगामी संघटना गेली अनेक वर्षे नव्या वर्षातील पहिला राष्ट्रीय उत्सव म्हणून सावित्री उत्सव साजरा करीत आहेत.

यानिमित्ताने सावित्रीबाईंच्या खांद्याला खांदा लावून साथ देणार्‍या फातिमा शेख यांचे ही योगदानाला सलाम करण्यासाठी नवीन वर्षापासून शिक्षण क्षेत्रात कार्यकरणार्‍या महिलांना विचारधारा व सावित्री उत्सव च्या वतीने सावित्री फातिमा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात येणार आहे.सावित्री उत्सव हा संपूर्ण अहमदनगरचा उत्सव व्हावा यासाठी लवकरच व्यापक बैठक घेऊन उत्सवाच्या स्वागताध्यक्ष निवडण्यात येईल व त्यांच्या नेतृत्वाखाली दि 3 जानेवारी ते दि 30 जानेवारी (म.गांधी स्मृतिदिन) पर्यंत विविध उपक्रम करण्यात येणार आहे अशी माहिती विठ्ठल बुलबुले व संगीताताई गाडेकर यांनी दिली.