अहमदनगर (दि २४ डिसेंबर २०२०) । प्रतिनिधी -गेल्या तीन वर्षांपासून बाजारसमितीचे बंद असलेले मुख्य गेट तात्काळ उघडण्यात यावे, अशी सूचना सुरक्षा समितीचे अध्यक्ष खासदार सदाशिव लोखंडे यांनी जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांना पत्र पाठवून केली आहे, अशी माहिती भाजपचे ज्येष्ठ नेते वसंत लोढा यांनी दिली. वसंत लोढा यांच्या नेतृत्वाखाली व्यापार्‍यांच्या शिष्टमंडळाने आज जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांची भेट घेऊन खासदार सदाशिव लोखंडे यांनी पाठवलेले पत्र त्यांना देऊन चर्चा केली. यावेळी जिल्हाधिकार्‍यांनी ग्रामपंचायतच्या निवडणूक आचारसंहिता संपल्यानंतर रस्ते सुरक्षा समितीची स्वतंत्र बैठक घेऊन तातडीने कार्यवाही करण्यात येईल, असे ओशासन व्यापार्‍यांना दिले. यावेळी वसंत लोढा म्हणाले, बाजार समिती गेटची एक बाजू मागील तीन वर्षापासून बंद करण्यात आलेली आहे. गेट बंद असल्याने व्यापारी, नागरिक यांची मोठी गैरसोय होत आहे. याबाबत व्यापार्‍यांनी अनेकदा तक्रारी केल्या आहेत. मात्र प्रशासनाने दखल घेतली नाही. त्यामुळे रस्ता सुरक्षा समितीचे अध्यक्ष खासदार सदाशिव लोखंडे यांच्याकडे तक्रार केली असता त्यांनी तात्काळ दखल घेत जिल्हाधिकार्‍यांना पत्र दिले.