
अहमदनगर (दि २४ डिसेंबर २०२०) : कोरोना रोगावरील उपचारा दरम्यान रुग्णांना देण्यात आलेल्या वाढीव बिलाचा फरक परत देण्यासाठी संबंधित रुग्णालयांना अखेरची नोटीस काढण्यात आली आहे. यावरही संबंधितांनी रुग्णांच्या खात्यात पैसे जमा न केल्यास रुग्णालयांची नोंदणी रद्द करण्यात येणार आहे. महापालिका आयुक्तांनी हे आश्वासन दिल्यानंतर मनसेने आपले आंदोलन मागे घेतले आहे.
कोरोना रुग्णांकडून जास्त घेतलेले पैसे संबंधित रुग्णांना परत करण्याचे शहरातील 14 हॉस्पिटला आदेश दिले होते. रुग्णालयांकडून कार्यवाही होत नसल्याने त्यांच्याविरुद्ध साथरोग प्रतिबंधक कायद्यानुसार कायदेशीर कारवाई करण्याची तयारी आता महापालिकेने सुरू केली आहे. तशी लेखी ग्वाही महापालिकेने मनसेच्या पदाधिकार्यांना दिली आहे. मनसेचे बुधवारी या मागणीसाठी महापालिकेत ‘झोपा मारो’ आंदोलन केले. कोरोना काळात खासगी रुग्णालयांनी आवाच्या सवा बील आकारणी केल्याच्या तक्रारी होत्या.
बिले तपासण्यासाठी नियुक्त करण्यात आलेल्या भरारी पथकाने याची शहानिशा केल्यानंतर जादा आकारणी केल्याचे समोर आले. जादा आकारणीची वसुली करून ते पैसे संबंधित रुग्णांना देण्यात यावेत, असे आदेश पथकाने काढले. नगर शहरातील रुग्णालयांकडून हे पैसे वसूल करण्याचे काम महापालिकेला सांगितले. महापालिकेने संबंधित रुग्णालयांना नोटिसा काढून सात दिवसात रुग्णांच्या खात्यावर पैसे जमा करण्याचे आदेश दिले. 49 लाखांच्या रकमेपैकी केवळ पावणे दोन लाख रुपये रुग्णांना परत मिळाल्याने संबंधित रुग्णालयांवर कारवाई करण्याची मागणी करून मनसेने महापालिकेत आंदोलन केले. आयुक्त श्रीकांत मायकलवार यांनी संबंधित रुग्णालयांवर साथरोग प्रतिबंधक कायद्यानुसार कारवाई करून त्यांची नोंदणी रद्द करण्याची ग्वाही दिली. त्यापूर्वी शेवटची नोटीस रुग्णालयांना देण्यात येणार आहे.
दरम्यान, नगर शहरातील कोरोना पेशंटकडून जादा रक्कम घेतलेल्या हॉस्पिटलने जादा घेतलेली रक्कम परत न केल्याने संबंधित हॉस्पिटलवर कारवाई होत नव्हती. हॉस्पिटल चालकांना महापालिका पाठीशी घालत असल्याचा आरोप मनसेने केला होता. आंदोलनात मनसेचे जिल्हाध्यक्ष सचिन डफळ, जिल्हा सचिव नितीन भुतारे, मनोज राऊत, अॅड. अनिता दिघे, अशोक दातरंगे, पोपट पाथरे, गणेश शिंदे, तुषार हिरवे, अमोल बोरुडे, रतन गाडळकर, गणेश मराठे, दीपक दांगट, संकेत व्यवहारे, अभिनय गायकवाड, आकाश कोल्हार, आकाश पवार, विनोद काकडे आदी सहभागी झाले होते.
