अहमदनगर (दि २१ डिसेंबवर २०२०) : कोरोना काळात रुग्णांकडून घेतलेले वाढीव बील दोन महिने उलटूनही परत केलेले नसल्यामुळे कोरोनाकाळात रुग्णांना लुटणार्‍या हॉस्पिटलविरोधात मनसे आक्रमक झाली आहे. मनसेच्यावतीने 23 डिसेंबर रोजी महापालिकेत आंदोलन करण्याचा इशारा नितीन भुतारे यांनी दिला आहे. कोरोना रुग्णांना आकारलेल्या वाढीव बिलाची रक्कम परत करण्याचे आदेश महापालिकेने शहरातील 13 हॉस्पिटलला दिले होते. वाढीव बिलाची रक्कम संबंधित रुग्णांच्या खात्यावर सात दिवसात जमा करण्याचे आदेश दिले होते. 

तसे न केल्यास महापालिका कारवाई करणार असल्याचे पत्र 13 हॉस्पिटलला देण्यात आले होते. परंतु आजपर्यंत 48 लाख रुपये रक्कम परत करण्याचे आदेश महापालिकेने दिले दिले असताना 2 महिने उलटून देखील फक्त 1 लाख 71 हजार रुपये 3 हॉस्पिटलने परत केले आहेत. अजून जवळपास 47 लाख रुपये रुग्णांना परत करायचे शिल्लक आहेत. खासगी हॉस्पिटल चालकांनी उपजिल्हाधिकारी व महापालिका आयुक्त यांच्या आदेशाला केराची टोपली दाखवली आहे. दोन महिने उलटूनही रुग्णांना पैसे न मिळाल्याने मनपा अधिकारीच हॉस्पिटल चालकांना पाठिशी घातलात की काय, असा सवाल उपस्थित केला जात आहे. 

त्यामुळे रुग्णांना वाढीव बिलाची रक्कम परत मिळावी व जे हॉस्पिटल वाढीव बिलाची रक्कम परत करणार नाहीत, त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी मनसेच्या वतीने 23 डिसेंबर रोजी महापालिकेत अंदोलन करणार असल्याचे भुतारे यांनी पत्रकात म्हटले आहे. वाढीव रक्कम परत मिळण्यासाठी नागरिकांनी आंदोलनात सहभागी व्हावे, असे आवाहन भुतारे यांनी केले आहे. या आंदोलनात मनसेचे जिल्हाध्यक्ष सचिन डफळ, मनोज राऊत, शहराध्यक्ष गजेंद्र राशिनकर, अ‍ॅड. अनिता दिघे, तसेच शहरातील व तालुक्यातील मनसे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत.