
अहमदनगर : शास्तीमाफी योजनेस चांगला प्रतिसाद मिळाल्याने मालमत्ता कराच्या वसुलीत मोठी वाढ झाली आहे.मनपाच्या तिजोरीत 47 कोटी जमा झाले आहेत. मनपा प्रशासनाने शास्तीच्या 75 टक्के सवलतीस 1 ते 15 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ दिली होती. या 15 दिवसांच्या कालावधीत 6 कोटी रूपयांची वसुली झाली आहे. दरम्यान, आजपासून 50 टक्के शास्ती सवलत योजनेस सुरूवात झाली आहे. त्याची मुदत 31 डिसेंबरपर्यंत आहे. शास्ती सवलतीची योजना संपल्यानंतर मनपाकडून बड्या थकबाकीदारांच्या मालमत्तांवर जप्तीची कारवाई केली जाणार आहे.करोना संकटामुळे मालमत्ता कराची वसुली झाली नव्हती. एप्रिल ते ऑक्टोबर या कालावधीत केवळ 13 कोटींची वसुली झाली होती. मनपा तिजोरीत खडखडाट असल्याने विकासकामांवरही त्याचा परिणाम झाला होता. त्यामुळे सर्वपक्षीय नगरसेवकांनी सर्वसाधारण सभेत शास्तीमाफीची मागणी केली होती. मनपा आयुक्त श्रीकांत मायकलवार यांनी शास्तीमाफीचा निर्णय घेत नोव्हेंबर महिन्यात 75 टक्के शास्तीमाफी जाहीर केली. नोव्हेंबर महिन्यात कराच्या वसुलीला चांगला प्रतिसाद मिळाला. नोव्हेंबरपर्यंत 41 कोटींची वसुली झाली. दरम्यान, शास्तीमाफी योजनेस प्रतिसाद मिळाल्याने नगरसेवकांनी शास्ती माफीस मुदतवाढ देण्याची मागणी केली होती. त्यानुसार प्रशासनाने प्रारंभी 15 डिसेंबरपर्यंत 75 टक्के शास्तीमाफीचा निर्णय घेतला. त्यानंतर दि.15 ते 31 डिसेंबर या कालावधीत 50 टक्के सवलत जाहीर करण्यात आली आहे. दरम्यान, मुदतवाढीच्या या 15 दिवसांत मनपाने 6 कोटी रूपयांची वसुली केली आहे. या कालावधीत दररोज सुमारे 35 ते 40 लाखाची वसुली झाली आहे.त्यामुळे चालू आर्थिक वर्षात मनपाची मालमत्ता कराची वसुली 47 कोटींवर गेली आहे. आता, आजपासून 50 टक्के सवलत योजना लागू झाली असून या योजनेसही चांगला प्रतिसाद मिळेल,अशी अपेक्षा मनपा बाळगून आहे.

