शिर्डी, (प्रतिनिधी) – शिर्डीकडे निघालेल्या भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई यांना पोलिसांनी पारनेर तालुक्यातील म्हसणे फाटा येथे ताब्यात घेतले. देसाई यांचे आंदोलन मोडून काढण्यासाठी शिर्डीतही मोठ्या संख्येने महिला व कार्यकर्ते जमा झाले होते. मात्र देसाई यांच्या अटकेचे वृत्त समजताच साईनगरीत फटाके फोडून व एकमेकांना पेढेभरवून भाविक व नागरिकांनी आनंद व्यक्त केला. साईदर्शनासाठी भारतीय पेहराव करून येण्याचे आवाहन साई संस्थानने फलकाद्वारे केले होते. या निर्णयाचे भाविकांनी उत्स्फूर्त स्वागत केले होते. मात्र तृप्ती देसाई यांनी संस्थानच्या या निर्णयावर आक्षेप घेतला होता.

संस्थानला मंदिरातील अर्धनग्न पुजारी कसे चालतात, असा प्रश्‍नही उपस्थित केला होता. तसेच संस्थानने फलक हटवले नाही, तर 10 डिसेंबरला शिर्डीत येवून फलक काढून टाकण्याचा इशाराही देसाई यांनी दिली होता. देसाई यांच्या आक्षेपावर शिर्डीत तीव्र प्रतिक्रिया उमटल्या होत्या. येथील शिवसेना, भाजप, मनसे महिला आघाडी तसेच ब्राह्मण महासंघाने देसाई यांना शिर्डीत येवून फलक काढूनच दाखवावाच, असे प्रतिआव्हान दिले होते. प्रसंगी तोंडाला काळे फासण्याचा व धडा शिकवण्याचा इशाराही देण्यात आला होता.

त्यामुळे प्रांताधिकारी गोविंद शिंदे यांनी देसाई यांना नोटीस बजावून शिर्डीत येण्यास प्रतिबंध केला होता. तरीही त्यांनी आदेश झुगारून शिर्डीत येण्याचा निर्णय जाहीर केला होता. त्यामुळे शिर्डीत व जिल्ह्याच्या सीमेवर पोलिसांनी बंदोबस्त वाढवला होता. सकाळपासूनच मंदिर परिसराच्या बाहेर स्थानिक महिलांसह भाजप, शिवसेनेच्या महिला कार्यकर्त्या , ब्राह्मण महासंघाचे पदाधिकारी देसाई यांची वाट पाहत होते. मात्र देसाई यांना पारनेर तालुक्यातील म्हसणे फाटा येथे सुपा पोलिसांनी ताब्यात घेतल्याची वार्ता शिर्डीत येताच महिलांनी जल्लोष केला. यावेळी भाजपच्या नगरसेविका वंदना राजेंद्र गोंदकर, छाया शिंदे, रंजना सावंत, मनीषा शिंदे, शिवसेनेच्या स्वाती कुमावत तसेच रेखा वैद्य, प्रतिभा गोंदकर,रूपाली तांबे, तनुजा गोंदकर,मीनाक्षी डुबल, उषा कुमावत, आशा परदेशी, कीर्तना रेड्डी,शिवाजी चौधरी, विजय काळे,सुनील परदेशी, नानक सावंत्रे,ब्राह्मण महासंघाचे संतोष दवे पाटील आदींची उपस्थिती होती.