
अहमदनगर (दि ११ डिसेंबर २०२०) -शहरातील मुकुंदनगर भागातील रहिवाशांच्या वीज मीटर व डीपीच्या प्रश्नासंदर्भात जन आधार सामाजिक संघटनेच्या वतीने महावितरण कार्यालयात कार्यकारी अभियंता नितीन धर्माधिकारी यांना निवेदन देण्यात आले. यावेळी जन आधार सामाजिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्रकाश पोटे, फारुक शेख, शहाबाज शेख,शहानवाज शेख कॉन्ट्रॅक्टर,शब्बीर सय्यद,मिजान कुरेशी, मुर्शिद शेख, रिजवान सय्यद, नसीर सय्यद,अजय सोळंकी, मच्छिंद्र गांगर्डे,वसीम शेख आदींसह स्थानिक नागरिक उपस्थित होते.मुकुंदनगर येथील नागरिकांच्या घराचे मीटर एकत्रितरित्या त्यांच्या घरासमोरील विद्युत खांबावर बसवण्यात आले आहे. हे काम ठेकेदाराने नियमाप्रमाणे केले नसून, अनेक ठिकाणी या बॉक्सची उंची ही जमिनीपासून कमी अधिक प्रमाणात ठेवलेली आहे. काही ठिकाणी तर जमिनीपासून अवघ्या चार फूट उंचीवर हे बॉक्स बसविण्यात आले आहे. हे ठिकाण हे अत्यंत गजबजलेल्या रहिवासी ठिकाणी आहे. या भागातील लहान मुले परिसरात खेळत असतात. मीटर बॉक्सच्या केबलला किंवा केबल कट झाल्यामुळे विद्युत खांबावर करंट उतरून मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.तसेच या भागात अनेक वर्षांपासून बसवलेली डीपी त्याच रहदारीच्या ठिकाणी अगदी रोडलगत बसवण्यात आलेली आहे. या डीपीच्या केबल व मीटर बॉक्स पूर्णपणे उघड्या अवस्थेत आहेत. त्या डीपीच्या बाजूस संरक्षण भिंत किंवा तार कंपाऊंड करणे आवश्यक असल्याचे निवेदनात म्हटले आहे. विद्युत खांबावर कमी उंचीवर बसविण्यात आलेले मीटरला योग्य ठिकाणी नियमाप्रमाणे लावावे व डीपीला संरक्षक कंपाऊंड टाकण्याची मागणी करण्यात आली आहे. या ठिकाणी काही दुर्घटना घडल्यास त्याला महावितरण कार्यालय जबाबदार राहणार असल्याचे स्पष्ट करुन, प्रश्न न सुटल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
