अहमदनगर : देशासाठी सीमेवर अहोरात्र पहारा देऊन लढणार्‍या सैनिकांबद्दल सर्वांना अभिमान आहे. त्यामुळेच ध्वजनिधीच्या माध्यमातून त्यांच्याप्रती असणारी कृतज्ञता व्यक्त करुन ध्वजनिधीचे उद्दिष्ट्य साध्य करावे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी डॉ. राजेन्द्र भोसले यांनी केले.  ध्वजनिधी २०२० निधी संकलन कार्यक्रमाचा शुभारंभ सोमवारी जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांच्या हस्ते झाला. त्यावेळी ते बोलत होते. कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर अतिशय साधेपणाने, कमी उपस्थितीत आणि सर्व नियमांचे पालन करीत हा कार्यक्रम पार पडला. जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र क्षीरसागर, लेखाधिकारी, सैनिक कल्याण विभाग, पुणे तथा जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, अहमदनगर विजय वाघचौरे यांच्यासह विविध कार्यालयांचे प्रमुख यावेळी उपस्थित होते.  यावेळी जिल्हाधिकारी डॉ. भोसले म्हणाले, जवान अथक आणि अहोरात्रपणे देशाच्या सीमेवर पहारा देत असतात. त्यामुळे आपण सर्व देशवासिय शांततेने राहू शकतो. त्यामुळेच ध्वजनिधी संकलनास सढळ हाताने मदत करुन प्रत्येकाने आपले कर्तव्य बजावले पाहिजे.

ध्वजनिधी २०२० संकलनाचे उद्दिष्टय मार्च, २०२१ अखेरपर्यंत पूर्ण होईलच, परंतू कोविड-१९ मुळे मागील वर्षी थकीत असलेले संकलन सुद्धा पूर्ण करावयाचे असल्याचे त्यांनी नमूद केले. त्यासाठी सर्व शासकीय कार्यालये, निमशासकीय कार्यालये, विविध महामंडळे, सहकारी संस्था या व इतर यंत्रणांनी अधिकाधिक संकलनाच्या दृष्टीने काम करण्याचे आवाहनही त्यांनी केले. या कार्यक्रमामध्ये ध्वजदिन 2019 निधी संकलना कामी केलेल्या उत्कृष्ट कार्याबाबत जिल्हयातील कार्यालय प्रमुखांना जिल्हाधिकारी यांचे हस्ते स्मृतीचिन्ह व प्रशस्तीपत्र प्रदान करुन सन्मानीत करण्यात आले व ध्वजदिन 2020 च्या संकलनासाठी चांगले कार्य करण्यास प्रोत्साहीत केले. तसेच कोपरगाव तालुक्यातील दहेगाव बोलका येथील शहीद सैनिकाची वीरपत्नी श्रीमती मंगला सुनिल वालटे यांचा जिल्हाधिकारी यांचे हस्ते शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.         

कार्यक्रमाचे प्रास्ताविकात श्री. वाघचौरे यांनी ध्वजनिधी संकलनाबाबतची माहिती दिली. यावेळी शिक्षणाधिकारी प्राथमिक व माध्यमिक, जिल्हा उद्योग केंद्राचे अधिकारी व जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयातील सर्व अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

****