
अहमदनगर (दि ३ डिसेंबर २०२०) : यशस्विनी महिला ब्रिगेडच्या संस्थापक अध्यक्षा व राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्या रेखा भाऊसाहेब जरे यांच्या हत्या प्रकरणाचा पर्दाफाश पोलिसांनी केला आहे. पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांनी आज सायंकाळी साडेपाच वाजता यासंदर्भात पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली. ज्येष्ठ पत्रकार बाळ ज. बोठे याने सुपारी देऊन हे हत्याकांड घडविल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. मुख्य सूत्रधार बोठे फरारी झाला असून, त्याच्या शोधासाठी पाच पथके मागावर पाठविण्यात आल्याची माहिती पाटील यांनी दिली. रेखा जरे यांची सोवारी रात्री पुण्याहून कारमधून नगरला येतअसताना जातेगाव घाटात (ता. पारनेर) दुचाकीवर आलेल्या दोघांनी धारदार शस्त्राने गळा चिरून त्यांची हत्या केली. या प्रकरणी पोलिसांनी मंगळवारी रात्री फिरोज राजू शेख (वय 26, रा. संक्रापूर, ता. राहुरी) व ज्ञानेश्वर शिवाजी शिंदे (वय 24, रा. कडीत फत्तेबाद, ता. श्रीरामपूर) तसेच आदित्य सुधाकर चोळके (रा. तिसगाव फाटा, कोल्हार, ता. राहाता) या तिघांना अटक केली. यातील मारेकरी शेख व शिंदे यांना चोळके याने सुपारी दिल्याचे पुढे आले. पारनेर न्यायालयाने या तिघांना पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. दरम्यान, तिघांच्या चौकशीत केडगावमधील सागर उत्तम भिंगारदिवे (वय 31, रा. शास्त्रीनगर, केडगाव) व ऋषिकेश ऊर्फ टम्या वसंत पवार (वय 23, प्रवरानगर,ता. राहाता) यांची नावे पुढे आली. त्यांना आज सकाळी अटक केल्यानंतर तपासाला गती मिळून मुख्य सूत्रधाराचा पर्दाफाश झाला.
