
अहमदनगर (दि १ डिसेंबर २०२०) : शीख धर्मियांचे पहीले धर्मगुरु गुरु नानक देवजी जयंतीच्या दिनी दरवर्षी उत्कृष्ट सामाजिक कार्य करणार्या व्यक्तीला प्रदीप पंजाबी परिवाराच्यावतीने गुरुनानक रत्न” पुरस्कार देऊन गौरविण्यात येते. या वेळेचा गुरुनानक रत्न पुरस्कार हा श्रीरामपूर उपविभागाचे उपअधिक्षक संदीप मिटके यांना देण्यात आला.कोरोना विषाणूचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी शासनाने घोषीत केलेल्या टाळेबंदीची नगर शहरात श्री संदीप मिटके यांनी प्रभावी अंमलबजावणी तर केलीच शिवाय आपली जबाबदारी उत्तमपणे पार पाडत लंगर सेवेसारख्या उपक्रमांना सहकार्य देखील केले.
पुरस्काराच्या रुपातुन मिळालेली रोख रक्कम श्री मिटके यांनी लंगर सेवेसाठी सुपूर्द केली.यावेळी आ. संग्राम जगताप म्हणाले की, श्री मिटके यांनी तीन वर्षांच्या शहर उपविभागाची जबाबदारी उत्तमपणे पार पाडली. कोरोना टाळेबंदीच्या काळात शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधीत राखण्यासाठी पोलिस दलाने स्वतःचा जीव धोक्यात घालून अहोरात्र सेवा दिली. यावेळी श्री मिटके म्हणाले,की, शीख समाज सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर असतो.
कोरोना टाळेबंदीच्या काळात शीख समाजातील प्रदीप पंजाबी, हरजीतसिंग वधवा, जनक आहुजा, दिलदार सिंग बीर व मित्रपरिवाराने हजारो भुकेलेल्यांची भूख भागवण्याचे महान कार्य लंगर सेवेच्या माध्यमातून केले आहे. गुरुनानक रत्न पुरस्कार माझ्यासाठी अभिमानाची बाब असून पुढील वाटचालीस प्रेरणा देणारा आहे. पुरस्काराची रक्कम मी लंगर सेवेसाठी सुपूर्द करीत असल्याचे श्री मिटके यांनी यावेळी सांगितले.
यावेळी प्रदीप पंजाबी म्हणाले की, पंजाबी परिवाराच्यावतीने गुरुनानक जयंती निमीत्त गुरुनानक रत्न पुरस्कार देण्यात येतो. डीवायएसपी श्री मिटके कोरोना टाळेबंदीच्या काळात केलेले कार्य खरोखर गौरवास्पद असल्याने या वर्षी त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी बबलू खोसला,मोहनसिंग वधवा, रविंद्र नारंग,प्रणित नारंग, राजेंद्र धुप्पड, सावन छाबरा, सागर सहानी,नगरसेवक योगीराज गाडे,अभिमन्यू नेहर, मोहीत पंजाबी,कुलबीरसिंग वाही व मोठया संख्येने शीख समाज बांधव उपस्थित होते.
