
अहमदनगर (दि ३० नोव्हेंबर २०२०)– सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे यांनी तब्बल 20 वर्षांपासून प्रसिद्ध होणार्या निशांत दिवाळी अंकाचे कौतुक केले. ना.धनंजय मुंडे नगरमध्ये आले असता संपादक निशांत दातीर यांनी त्यांना निशांत दिवाळी अंक देऊन स्वागत केले. ना.मुंडे म्हणाले, दिवाळी अंक प्रसिद्ध करणे वाटते तेवढे सोपे नाही.
साहित्याची निवड, जाहिरातींची जोड, आकर्षक छपाई व जमा-खर्च या सर्व बाबींचा विचार करत सातत्य टिकवणे फार जिकिरीचे असते.तब्बल 20 वर्ष निशांत दिवाळी अंकाने राज्यस्तरीय 56 पुरस्कार पटकावले म्हणजेच 20 वर्ष वाचकांच्या मनावर अधिराज्य गाजवले, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.
दैनिकाचा अथवा साप्ताहिकाचा दिवाळी अंक काढतांना त्यांचा वर्षभरातील बातमीचा अथवा नेटवर्कचा वा प्रभावाचा फायदा होत असतो. 20 वर्ष दिवाळी अंक चालविण्याचा निशांत दिवाळी अंकाची टिम निश्चित गौरवास पात्र ठरेल, असे ते म्हणाले. माजी केंद्रीय मंत्री शरद पवार, माजी केंद्रीय मंत्री गोपीनाथ मुंडे, माजी मंत्री प्रा.राम शिंदे, राज्यमंत्री दत्तात्रय भरणे आीद मान्यवरांनी गौरविलेल्या या दिवाळी अंकाची 20 वी आवृत्ती मला वाचण्याचा योग आला याचे मी भाग्य समजतो, असे म्हणून त्यांनी कौतुकाची थाप टाकली.
