
अहमदनगर (दि ३० नोव्हेंबर २०२०) – भाजपची वाटचाल संघर्षातून झालेली आहे. पक्षाची ध्येय व धोरणे ही निश्चित करुन कार्यकर्ते ती सर्वसामान्यांपर्यंत पोहचवत असतात. त्यामुळे पक्षात कार्यकर्त्यांला मोठे स्थान आहे. शिस्त व नियोजन ही पक्षाची मूळ धारा आहे, कार्यकर्ता ही पक्षाची खरी ताकद आहे. यामुळेच पक्षाची वाटचाल हळूहळू होत गेली तरी इच्छित साध्य केलेले आहे. परंतु कार्यकर्त्यांनी एवढ्यावर न थांबता आपण आपल्याला दिलेल्या जबाबदारी भान ठेवून पक्षाच्या ध्येय-धोरणानुसार काम केले पाहिजे. त्याचबरोबर पक्षासाठी योगदान देणार्या ज्येष्ठांचाही आदर्श व आदर ठेवला पाहिजे असे मौलिक विचार भाजपाचे ज्येष्ठ नेते गुलशन जग्गी यांनी कार्यकर्त्यांनापुढे मांडले.
भाजपा नगर शहर जिल्हा कार्यक्रमा प्रशिक्षण शिबिराचे उद्घाटन ज्येष्ठ नेते गुलशन जग्गी यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी शहर जिल्हाध्यक्ष महेंद्र गंधे, महापौर बाबासाहेब वाकळे, उपमहापौर मालनताई ढोणे, अॅड.अभय आगरकर, सुनिल रामदासी, वसंत लोढा,संघटन सरचिटणीस अॅड.विवेक नाईक, जिल्हा सरचिटणीस महेश नामदे, सरचिटणीस तुषार पोटे, प्रा.मधुसूदन मुळे, महिला बाल कल्याण सभापती लता शेळके आदी उपस्थित होते.
याप्रसंगी शहर जिल्हाध्यक्ष महेंद्र गंधे म्हणाले, आज देशात तसेच अनेक राज्यात भाजपाची सत्ता आहे, त्याचे प्रमुख श्रेय हे सर्वसामान्य कार्यकर्त्यांना पक्ष देतो त्यामुळे पक्षात कार्यकर्ता हा महत्वाचा घटक आहे. कार्यकर्त्यांनी पक्षाच्या ध्येयधोरणा बरोबरच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजपाच्या सरकारने सर्वसामान्यांसाठी राबविलेल्या योजना तळागाळात जाण्यासाठी प्रयत्न करावेत.
