अहमदनगर दि. 28 – महिलांच्या शिक्षणाविषयी महात्मा फुले यांना तळमळ होती. त्यामुळेच त्यांनी पहिली मुलींची शाळा उघडली. महात्मा फुले यांच्या दुरदृष्टीनेच महिलांना शिक्षणाची दारे उघडी झाली. आणि त्यामुळेच आज महिला विविध क्षेत्रात आपल्या कार्यकर्तुत्वाने यशस्वी होत आहेत. त्यांचे खरे प्रेरणास्थान हे महात्मा ज्योतिबा फुले व सावित्रीबाई फुले आहे. शिक्षणाचा प्रचार आणि प्रचाराबरोबरच महिलांच्या उन्नत्तीसाठी केलेले कार्य प्रेरणादायी आहे. त्यांचे विचार आपण आचारणात आणणे हीच खरी त्यांना आदरंजली ठरेल,असे प्रतिपादन नगरसेवक बाळासाहेब बोराटे यांनी केले.

श्री संत सावता शिक्षण समितीच्या महात्मा फुले विद्या मंदिराच्या वतीने क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुण्यतिथीनिमित्त माळीवाडा येथील त्यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष तथा नगरसेवक बाळासाहेब बोराटे, पंडितराव खरपुडे, विष्णूपंत म्हस्के, मुख्याध्यापक संजय चौरे व शिक्षकवृंद आदी उपस्थित होते.

याप्रसंगी मुख्याध्यापक संजय चौरे म्हणाले, महात्मा फुले यांनी मुलींच्या शाळांबरोबरच अस्पृशांसाठी दोन शाळा उघडल्या अशाप्रकारे त्यांनी अनेक शाळा उघडल्या.त्या काळातील भारतातील शिक्षण विषयक प्रश्‍नासंबंधी चौकशी करुन सुधारणा सुचवण्यासाठी ब्रिटीश शासनाने हंटर यांच्या अध्यक्षतेखाली एक मंडळ नेमले होते. तेच मंडळ पुढे भारतीय शिक्षण आयोग म्हणून देखील ओळखला जावू लागले. याप्रसंगी उपस्थितांनी महात्मा फुले यांच्या कार्याचा गौरव केला.