अहमदनगर : महात्मा ज्योतिबा फुले यांनी तत्कालीन समाजातील जातीभेद, अनिष्ट प्रथा यांच्या विरुद्ध मोठा लढा उभारला होता. समताधिष्ठित समाजाच्या निर्मितीमध्ये क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांचे मोलाचे योगदान आहे,असे प्रतिपादन काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी केले आहे. महात्मा फुले यांच्या पुण्यतिथीनिमित्त अहमदनगर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने माळीवाड्यातील महात्मा फुले यांच्या पुतळ्याला हार करून काँग्रेस पक्षाच्या वतीने अभिवादन करण्यात आले.यावेळी ते बोलत होते.काळे यावेळी बोलताना म्हणाले की, समाजाला प्रबोधन आणि सामाजिक परिवर्तनाची वाट दाखवण्याचे काम महात्मा फुलेंनी केले. त्यांनी त्यावेळी केलेले काम हे आजही तितकेच प्रेरणादायी आहे. महात्मा फुले हे क्रांतीसुर्य म्हणून जनसामान्यांच्या मनामध्ये आहेत. त्यांचा विचार हा समाजातील तळागाळातल्या शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवण्याच काम कायमच काँग्रेस पक्षाने केल आहे. ज्ञानदेव वाफारे म्हणाले की, महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले या दाम्पत्याने या देशाला शिक्षण मिळविण्याचा हक्क मिळवून दिला. त्यासाठी त्यांना मोठ्या विरोधाला सामोरे जावे लागले.पण यातूनच शिक्षित भारताची निर्मिती झाली. युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष स्मितल वाबळे म्हणाले की, महात्मा फुले यांच्या विचारांची शिदोरी ही युवकांपर्यंत अधिक प्रभावीपणे पोहोचवली पाहिजे