अहमदनगर (दि २८ नोव्हेंबर २०२०) : महानगरपालिकेने मालमत्ता करावरील 75 टक्के शास्तीमाफी केल्यामुळे चालू महिन्यात समाधानकारक कर वसुली होत आहे. आतापर्यंत 32 कोटींची वसुली झालेली असून अनेक मालमत्ताधारक कर भरण्यास तयारआहेत. मात्र करोनाचा लॉकडाऊन तसेच अन्य कारणांनी अनेकांसमोर आर्थिक अडचणी आहेत. अशा परिस्थितीत अनेकांकडून शास्ती माफीस आणखी काही काळ सवलत देण्याची मागणी होत आहे. ही बाब लक्षात घेवून तसेच मनपाची वसुली प्रभावी होण्यासाठी डिसेंबर 2020 अखेरपर्यंत शास्ती माफीची सवलत चालू ठेवावी अशी मागणी नगरसेविका मीनाताई चोपडा यांनी केली आहे.

याबाबत त्यांनी मनपा आयुक्त श्रीकांत मायकलवार यांना निवेदन दिले आहे.या निवेदनात चोपडा यांनी म्हटले आहे की, करोनामुळे यंदाचे संपूर्ण वर्ष सर्वांसाठीच प्रचंड अडचणींचे ठरले आहे. त्याचा थेट परिणाम मनपाच्या मालमत्ता कर वसुलीवरही झाला आहे. नोव्हेंबरमध्ये नगरसेवकांच्या मागणीनुसार प्रशासनाने 75 टक्के शास्तीमाफीचा निर्णय घेतला. त्याला मालमत्ताधारकांकडून चांगला प्रतिसादही मिळत आहे.असे असले तरी अनेकांची इच्छा असूनही आर्थिक अडचणींमुळे ते सध्या कर भरणा करू शकत नाही. त्यामुळे अनेक जण येवून शास्ती माफीची सवलत आणखी काही काळ चालू ठेवण्याची विनंती करीत आहे.

याशिवाय मनपाच्या घरपट्टीबाबत अनेकांनी मनपाकडे तक्रारी केलेल्या आहेत. या तक्रारींचे निवारण मनपा प्रशासनाकडून वेळेत होत नसल्यानेही थकबाकी वाढलेली आहे. नागरिकांचे घरपट्टीबाबतचे असे अर्ज प्राधान्यक्रमाने निकाली काढल्यास ते कर भरणा करू शकतील. केवळ मनपा प्रशासनाच्या दिरंगाईमुळे थकबाकी व शास्ती वाढत गेल्यास नागरिकांना त्याचा नाहक भुर्दंड पडतो. ही बाब प्रशासनाने लक्षात घेतली पाहिजे.याबरोबरच सध्या कर भरणा धनादेश अथवा रोखी करण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी होत आहे.

करोना संसर्ग सुरु असताना अशी गर्दी टाळण्यासाठी मनपाने ऑनलाईन कर भरणा व्यवस्थाही सक्षम केली पाहिजे.सध्या ऑनलाईन पेमेंटसाठी अनेक चांगल्या सुविधा उपलब्ध आहेत. त्याबाबत प्रशासनाने जागृती केल्यास नागरिकांचा कर भरण्यासाठी रांगेत उभे राहण्याचा वेळ वाचू शकतो. तसेच गर्दीही आटोक्यात राहू शकते. मालमत्ता कर वसुली महानगरपालिकेच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाची आहे. या वसुलीवरच विकासकामे अवलंबून असतात. त्यामुळे प्रशासनाने नागरिकांना शास्ती माफीसारखी सवलत आणखी एक महिन्यापर्यंत वाढवून द्यावी, अशी मागणी चोपडा यांनी केली आहे.