
अहमदनगर (दि २७ नोव्हेंबर २०२०) : केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजना- ग्रामीण आणि राज्य पुरस्कृत विविध आवास योजनांना गतिमान करण्यासाठी आणि गुणवत्ता वाढीसाठी राज्यात महाआवास अभियान – ग्रामीण राबविण्यात येत आहे.या अभियानांतर्गत जिल्ह्यातील गटविकास अधिकार्यांनी गावनिहाय विविध प्रलंबित प्रस्तावांचा आढावा घेऊन येत्या आठ दिवसात परिपूर्ण प्रस्ताव सादर करावेत. या अभियानाची जिल्ह्यात योग्य प्रकारे अंमलबजावणी करावी आणि जिल्हा राज्यात अग्रेसर राहील,यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.राजेन्द्र भोसले यांनी केले.महाआवास अभियान ग्रामीण राबविण्या संदर्भात आज विभागस्तरीय कार्यशाळा झाली. या कार्यशाळेस विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी मार्गदर्शन केले.
त्यानंतर जिल्ह्यातील गटविकास अधिकार्यांची बैठक घेऊन त्यांनी अभियानाच्या अंमलबजावणीबाबत सूचना दिल्या. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र क्षीरसागर, अपर जिल्हाधिकारी पी. एल. सोरमारे, निवासी उपजिल्हाधिकारी संदीप निचित,जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक आदींची यावेळी उपस्थिती होती.आवास योजनेत जिल्ह्याला मिळालेले उद्दिष्टय, त्यातील किती घरकुलांना मंजुरी दिली, उर्वरित घरकूल मंजुरीसाठी येणार्या तांत्रिक अडचणी जिल्हाधिकारी डॉ.भोसले यांनी तालुकानिहाय आढावा गटविकास अधिकारी यांच्याकडून घेतला.
प्रत्येक गावांमध्ये जिल्हा गावठाणात असलेल्या गायरान व मोकळ्या जागा किती आहेत, त्या गावासाठी मंजूर घरकुले,अतिक्रमण असलेली परंतू नियमानुकूल करण्यात आलेली घरकुले, ज्या ठिकाणी नियमानुकूल करण्यात अडचणी असतील, तेथे अन्यत्र जागा उपलब्ध करुन घ्याव्यात,अशा सूचना त्यांनी केल्या. हे काम गतिमान पद्धतीने होणे आवश्यक असून महा आवास अभियान राबविण्यात आपण राज्यात अव्वल राहू, अशा पद्धतीने काम करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. योजनेची प्रभावी अंमलबजावणी होण्याच्या दृष्टीने सहभागी यंत्रणांची तालुकास्तरीय कार्यशाळा आयोजित करण्याची सूचनाही त्यांनी केली.




