
राहाता (दि २३ नोव्हेंबर २०२०) – वाढीव वीजबिले पाठवून महाविकास आघाडी सरकारने ग्राहकांना शॉक दिला आहे.तिजोरीत पैसा नसताना केवळ सवंग लोकप्रियतेसाठी घोषणा सुरू आहेत. बिघाडी सरकारच्या फसव्या धोरणांचीच होळी रस्त्यावर उतरून करण्याची वेळ आली आहे. घोषणाबाज सरकारचा फ्यूजही आता उडाला असल्याची टीका भाजपचे ज्येष्ठ नेते आ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली. महावितरण कंपनीच्या वतीने ग्राहकांना देण्यात आलेल्या वाढीव बिलांची होळी व सरकारच्या फसव्या धोरणांचा निषेध करण्यासाठी आ. विखे पाटील यांच्या नेतृत्वाखाली लोणी बुद्रुक येथे आंदोलन करण्यात आले.
यावेळी वीजबिलांची होळी करुन महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात भाजप कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली.यावेळी ज्येष्ठ नेते काशिनाथ विखे,एम. वाय. विखे, किसनराव विखे, नंदू राठी, सुभाषराव विखे,संचालक संजय आहेर, सिनेट सदस्य अनिल विखे, माजी सरपंच लक्ष्मण बनसोडे, माजी उपसरपंच अनिल विखे, रावसाहेब साबळे, अशोक धावणे, विक्रांत विखे, खंडू धावणे, संतोष विखे, अनिल विखे, शंकर विखे यांच्यासह शेतकरी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.राज्य सरकारच्या धोरणांवर टीका करताना आ. विखे पाटील म्हणाले, लॉकडाऊनच्या कालावधीमध्ये सामान्य माणसाला महावितरण कंपनीने वाढीव बिले पाठवून ग्राहकांवर आर्थिक भार टाकला आहे.
