
वृत्तसंस्था (२४ नोव्हेंबर २०२०) : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा काही दिवसांपूर्वी पश्चिम बंगालमधील बांकुडा जिल्ह्याच्या दौऱ्यावर गेले होते. यादरम्यान त्यांनी भोजन आदिवासी पाड्यात जाऊन केले होते. याचे काही फोटोदेखील व्हायरल झाले होते. मात्र, शहांच्या या भूमिकेवर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आक्षेप घेत शहांनी आदिवासींच्या घरी जेवलेले जेवण फाइव्ह स्टार हॉटेलमधील होते असा आरोप केला आहे.
ममता बॅनर्जी यांनी वृत्तसंस्थेला दिलेल्या माहितीनुसार, बांकुडा जिल्ह्यात आदिवासी कुटुंबाच्या घरी अमित शाह यांनी पाहुणचार घेणे हे केवळ नाटक होते. अमित शाह यांच्यासाठी बनवलेले जेवण हे फाइव्ह स्टार हॉटेलमधून मागवण्यात आले होते असा गंभीर आरोप बॅनर्जी यांनी केले आहेत.
दरम्यान, शहा यांनी जेवलेले जेवण हे एका ब्राम्हण आचाऱ्याकडून बनवून घेतले असल्याचे एका वृत्तसंस्थेने म्हटले आहे.अमित शाह हे ५ नोव्हेंबर रोजी बांकुडामध्ये पोहेचले तेव्हा त्यांनी आदिवासी कुटुंबाच्या घरी जेवण केलं. जमिनीवर पंगतीमध्ये बसून जेवतानाचा अमित शाह यांचे फोटो सोशल नेटवर्किंगवर पाहायला मिळाले. चतुर्दिही गावामध्ये राहणाऱ्या विभीषण हंसदा यांच्या घरी शाह यांनी केळीच्या पानावर शाकाहारी जेवणाचा आनंद घेतला.
जे फोटो समोर आले त्यामध्ये अमित शाह यांनी वरण, भात, पोळी आणि भाज्यांचा आस्वाद घेतल्याचे पहायला मिळाले.पश्चिम बंगालमध्ये पुढच्या ६ महिन्यात विधानसभा निवडणुका होण्याची शक्यता आहे. त्यामुळे भाजपने आपला मोर्चा पश्चिम बंगालकडे वळला आहे.आत्तापासून भाजपने निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. केंद्रीय गृहमंत्री याच निमित्ताने दोन दिवसांचा पश्चिम बंगाल दौऱ्यावर जाऊन आले. बांकुडा जिल्ह्यात आदिवासींची लोकसंख्या अधिक आहे.
