छाया : राजू खरपुडे

अहमदनगर दि.23 – शेतकरी विरोधी कृषी कायदे व कामगार विरोधी चार श्रम संहिता रद्द करा या मागण्यासाठी देशभरातील 10 केंद्रीय कामगार संघटनांनी 26 नोव्हेंबर रोजी देशव्यापी संप पुकारला आहे. या संपाला 250 पेक्षा ही जास्त किसान संघटनांनी पाठीबा दिला आहे. या शेतकरी विरोधी कामगार विरोधी धोरणांना विरोध करत असतानाच अहमदनगर जिल्ह्यातील स्थानिक प्रश्‍न सोडविण्यात यावेत यासाठी हमाल पंचायत, कामगार संघटना महासंघ,आशा कर्मचारी, पतसंस्था कर्मचारी,यासंपात सहभागी होणार आहे, असे हमाल पंचायत अध्यक्ष अविनाश घुले यांनी सागितले.

या आंदोलनात मार्केट कमिटया बरखास्त करण्याचा कायदा रद्द करावा,माथाडी कामगारांना पेन्शन योजना लागू करावी, माथाडी कामगार कायद्याची अमलबजावणी करण्यात यावी.इत्यादी मागण्यांसाठी माथाडी कामगार सहभागी होणार आहेत. तर पतसंस्था कर्मचार्‍यांना किमान वेतन देण्यात यावे यासाठी पतसंस्था कर्मचारी आंदोलनात सामील होणार आहेत. त्याचबरोबर राज्य सरकारी कर्मचारी जुनी पेन्शन योजना पुन्हा लागू करा कायम स्वरूपी कामांमध्ये कंत्राटी करणाला मज्जाव करा इत्यादी मागण्यांसाठी आंदोलन करणार आहेत, अशी माहिती राज्य सरकारी कर्मचारी संघटनेचे नेते रावसाहेब निमसे यांनी दिली.

तसेच शहरात एम. आय. डी. सी.मध्ये सरकारी कामगार हॉस्पिटल निर्माण झाले पाहिजे, किमान वेतन मिळाले पाहिजे चार श्रम संहिता रद्द करा या मागण्यांसाठी औद्योगिक कामगार या देशव्यापी संपात सहभागी होणार आहेत,असे कामगार संघटना महासंघाचे कॉ.भैरवनाथ वाकळे यांनी सागितले.

बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडून नोंदीत बांधकाम कामगारांना पूर्वीप्रमाणे आरोग्य विमा सुरू करावा व नवीन नोंदणी पद्धत ऑनलाइन बबरोबरच ऑफलाइन पद्धतीनेही सुरू ठेवावी, असे बांधकाम कामगार संघटनेचे सरचिटणीस नंदु डहाणे यांनी सागितले. या आंदोलनाला अहमदनगर महानगरपालिका कामगार संघटनेचा पाठीबा आहे, असे कॉ.अनंत लोखंडे यांनी सागितले.