अहमदनगर (दि २४ नोव्हेंबर २०२०) : नगर तालुक्यातील कापूरवाडी येथील ह.सय्यद इसहाक पिरमिरावली दर्गा पहाड ट्रस्टच्या वतीने सालाबादप्रमाणे साजरा होणारा संदल व उरुस यंदा करोनामुळे रद्द करण्यात आला आहे.यानिमित्त गुरुवार दि.26 व शुक्रवार दि.27 नोव्हेंबर रोजी होणारे कार्यक्रम यंदा होणार नाहीत. कोविड-19 च्या दुसर्‍या लाटेच्या शक्यतेमुळे शासनाच्या निर्देशानुसार जिल्हाधिकारी यांच्या लेखी आदेशाप्रमाणे,भिंगार कॅम्प पोलिस स्टेशनच्या वतीने कळविल्यामुळे चितळेरोड येथील मिरावली दर्गा येथून निघणारी संदल, फुलांची चादर मिरवणूक तसेच उरुसनिमित्त पहाडावर होणारा महाप्रसाद भंडारा रद्द करण्यात आला आहे.

करोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे दर्शनासाठी येणार्‍या भाविकांनी स्वत:ची काळजी स्वत: घेणे गरजेचे आहे. दर्गा परिसरात सोशल डिस्टन्िंसगचे पालन करुन प्रत्येकाने मास्कचा वापर सक्तीने करणे बंधनकारक आहे. तसेच 65 वर्षांवरील व्यक्ती, 10 वर्षांखालील बालके व गरोदर महिलांनी संदलच्या दिवशी पहाडावर येऊ नये, असे आवाहन करण्यात आले आहे.