
औरंगाबाद (२३ नोव्हेंबर २०२०) : बेईमानीने राज्यात सत्तेवर आलेले महाविकास आघाडी सरकार किती काळ चालेल हे सांगता येणार नाही, परंतु आता मात्र तुम्हाला पहाटेचा नव्हे तर योग्यवेळी झालेला शपथविधी बघायला मिळेल,असा विश्वास विधानसभेचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी येथे व्यक्त केला. शरद पवारांच्या त्या खेळीमुळेच मराठवाडा पदवीधर मतदारसंघातील भाजपचे उमेदवार शिरीष बोराळकर यांच्या प्रचारासाठी शहरात आलेल्या फडणवीस यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
महाविकास आघाडीचे सरकार वर्षानुवर्षे चालेल, असा दावा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ऑनलाईन सभेत केला होता.याकडे लक्ष वेधले असता, जनतेने निवडून न दिलेले तसेच बेईनामीने सत्तेवर आलेले सरकार किती काळ चालेल हे आताच सांगता येणार नाही, परंतु राज्यातील जनतेला आता पहाटेचा नव्हे तर योग्यवेळीचा शपथविधी बघायला मिळेल, अशा शद्बांत फडणवीस यांनी सरकारच्या स्थिरतेबद्दल प्रश्न उपस्थित केला. कोरोनाची दुसरी लाट येऊ नये, अशी अपेक्षा व्यक्त करीत मॉल, बार उघडल्याने कोरोना होत नाही,असे राज्य सरकारला वाटते, परंतु मंदिरे उघडल्याने कोरोना होईल, अशी भीती व्यक्त केली जाते.
मंदिरे उघण्याची मागणी करताच त्यांचा पोटशूळ उठतो, अशी टीका फडणवीस यांनी केली. मंदिरांमध्ये सोशल डिस्टन्सिंगचे पालन व्हायलाच हवे तसे न केल्यास संबंधितांवर कारवाई करावी,अशी मागणी त्यांनी केली.आमच्या काळात मराठवाडा हा राज्य सरकारच्या टॉप अजेंड्यावर होता.महाविकास आघाडी सरकारचे मात्र मराठवाड्याकडे दुर्लक्ष होत आहे.मराठवाडा वॉटर ग्रीड योजना या सरकारने कोमात टाकली. कोकणातील समुद्रात वाहून जाणारे पाणी मराठवाड्यात आणण्याची योजनाही शीतपेटीत टाकण्यात आल्याचा आरोप फडणवीस यांनी केला.
ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्याचे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी स्पष्टीकरण दिलेले आहे. मात्र, पतंप्रधान नरेंद्र मोदी हेदेखील ज्येष्ठ नेते असून,त्यांनाही मान- सन्मान आहे. शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादीचे नेते पंतप्रधानांबद्दल करीत असलेली वक्तव्ये दुर्देवी आहेत, असे फडणवीस यांनी स्पष्ट केले.
