सर्वजण दिवाळीची मोठी जोरदार तयारी करीत असतात. मोठी खरेदी, कपडे, फराळ असा सगळा बेत ठरलेलाच. त्यात सर्वजण अधिक उत्साही आणि सजग असतात ते आपल्या नव्या कपड्यांसाठी.दिवाळीच्या खास मोक्यावर आपला पेहराव अधिक उठावदार होण्यासाठी सर्वच प्रयत्नशील असतात.त्यामध्ये सेलिब्रेटींची बात काही औरच. पण, यंदाच्या दिवाळीत मात्र अभिनेत्या रितेश देशमुख याने अनोखा पेहराव केला आहे. त्याने स्वत:च्या मुलांसाठी आणि स्वत:साठी विशेष कपडे शिवले असून त्याचा व्हिडिओ त्याने सोशल माध्यमांवर शेअर केला.

सध्या हा व्हिडिओ खूपच व्हायरल होत असून या माध्यमातून रितेशने चांगला संदेश ही दिला आहे तसे पहायला गेले तर अभिनेता रितेश देशमुख कशाचीच काही कमतरता नाही. राजकीय घराण्याचा वारसा आणि स्वत: एक उत्तम अभिनेता कदाचित तो स्वत:ची कपडेही फॉरेन वरुनच खरेदी करत असावा.

त्यात दिवाळी म्हटलं की मग काय एखाद्या बॉलिवूडमधील खास डिझायनरकडून कपडे तयार करता आले असते. परंतु, रितेशने तसे न करता आपल्या आईच्या जुन्या साडीपासून स्वत:ला आणि स्वत:च्या दोन्ही मुलांसाठी कुर्ता शिवून घेतला आहे. या निमित्ताने त्याने जुनं ते सोनं या म्हणीला सत्यात उतरवत आईच्या मायेची झालरच या कपड्याद्वारे त्याने स्वत:वर ओढावून घेतली.