अहमदनगर (दि १२ नोव्हेंबर २०२० जामखेड) – आमदार रोहित पवार यांनी दिल्ली येथे केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांची भेट घेतली. यावेळी खर्डा ते कुर्डुवाडी पालखी मार्ग पूर्णत्वास नेण्याच्या मागणीसह मतदारसंघातील इतर रस्त्यांच्या विकासासाठी केंद्रीय रस्ते निधीस मान्यता देण्याची मागणी केली. तसेच अपघातातील जखमींवर वेळेत उपचार करता यावेत,यासाठी मिरजगाव परिसरात विशेष ट्रॉमा केअर सेंटर उभारण्याची मागणीही यावेळी केली.कर्जत-जामखेड मतदारसंघातून जाणार्‍या राष्ट्रीय महामार्गांची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे. त्यामुळे आमदार म्हणून निवडून आल्यापासून या रस्त्यांच्या कामासाठी पवार हे सातत्याने पाठपुरावा करत आहेत. त्यासाठी त्यांनी दिल्लीत गडकरी यांची दुसर्‍यांदा भेट घेवून रस्त्यांच्या कामाबाबत सविस्तर चर्चा केली व निवेदन दिले. पैठण ते पंढरपूर या पालखी महामार्गावरील खर्डा हे महत्त्वाचे स्थान आहे. संत एकनाथ महाराज, संत भगवानबाबा, संतगोरा कुंभार यांच्या पालख्यांसह असंख्य वारकरी या मार्गाने पंढरपूरला जातात. त्यामुळे खर्डा ते कुर्डुवाडी हा रस्ता पूर्णत्वास नेल्यास सोलापूर, नगर हे जिल्हे जोडले जातीलच, शिवाय इथल्या विकासालाही मोठा हातभार लागेल व वारकर्‍यांचीही गैरसोय होणार नाही. त्याचबरोबर नगर-करमाळा सोलापूर राष्ट्रीय महामार्गांच्या चौपदरी करण्याचे काम भारतमाला प्रकल्पांतर्गत प्रस्तावित आहे. सद्यस्थितीत या रस्त्याची दुरवस्था झाली आहे. त्यामुळे या रस्त्याच्या चौपदरीकरणाचे काम लवकर सुरू करावे, अशी मागणी त्यांनी गडकरी यांच्याकडे केली. या कामासाठी अडथळा असलेला भूसंपादनाचा व इतर प्रश्‍न जिल्हा प्रशासनाच्या पातळीवर पाठपुरावा करून मार्गी लावले व याबाबतचा अंतिम प्रस्ताव आपल्या विभागाकडे देण्यात आल्याचेही त्यांनी यावेळी गडकरी यांना सांगितले.