
अहमदनगर (१२ नोव्हेंबर २०२०) : दिवाळीनिमित्त अनामप्रेमने अहमदनगर जिल्ह्यातील दिव्यांगांना आज किराणा किट भेट दिले.अनामप्रेमचे माजी विद्यार्थी आणि सर्व कार्यकर्ते यांनी स्व-सहाय्य देत हा उपक्रम राबविला. घासातील घास गरजू दिव्यांग यांना दिल्याचा आनंद दिवाळीत मिळावा म्हणून अनामप्रेमचे कार्यकर्ते धडपडत आहेत. दिवाळी भेटीच्या या अभियानाने वेदनाच साधना झाल्याचे पाहून अनेक दिव्यांग किराणा किट हातात मिळाल्यावर भारावले आहेत. करोनाच्या पोर्शभूमीवर सर्व नियम पाळत आज अनामप्रेमला अहमदनगर जिल्ह्यातून अनेक दिव्यांग आले होते. उत्तर नगर जिल्हा आणि दक्षिण नगर जिल्हा येथील सर्वच्या सर्व तालुक्यांतून अनामप्रेमला गरजू दिव्यांग दिवाळी भेट स्वीकारण्यास आले होते. मागील 3 दिवसात इंटरनेट लिंकद्वारे सर्व प्रकारच्या दिव्यांगांची किराणा किट नोंदणी अनामप्रेमने पूर्ण करून घेतली. या नोंदणीनुसार 6 ते 40 वयोगटातील दिव्यांगांना हे किराणा किट देण्यात आले.करोना व अतिवृष्टी यामुळे नगर जिल्ह्यातील ग्रामीण भागातील दिव्यांग ज्यांचे जीवन हलाखीचे झाले आहे. शेतीवर, पशुपालन यावर ज्या दिव्यांग यांचे कुटुंब अवलंबून आहे त्यांचे खूप हाल आहेत हे अनेक दिव्यांग बोलून दाखवत होते. मतिमंद गटातील मुले-मुली यांचे पालक यांनी देखील अनामप्रेमकडे किट मिळण्यासाठी नोंदणी केली आहे. अनामप्रेमचे अध्यक्ष अजित माने, सचिव दीपक बुरम, डॉ.बापूसाहेब कांडेकर, डॉ.रवींद्र जगन्नाथ सोमाणी, इंजि.इकबाल सय्यद, उद्योजक फिरोज तांबटकर यांच्या हस्ते हे किट वाटप करण्यात आले. कमिन्स टेक्नॉलॉजीजचे व्हाइस प्रेसिडेंट आर.सी.रमण यांनी झेन उद्योग समूहाच्या प्रांगणात अनामप्रेमच्या दिव्यांग मुले-मुली यांना देखील आज किराणा किट दिले. यावेळी उद्योजक मिलिंद एकनाथ कुलकर्णी, उद्योजक राजीव गोपालभाई गुजर आदी उपस्थित होते.
अनामप्रेमला 400 किराणा किटची गरज
अनामप्रेमकडे अजून 400 गरजू दिव्यांग यांनी दिवाळी किटसाठी नोंदणी केली आहे. अनामप्रेमला जर 400 किराणा किट देणारे दाते मिळाले तर प्रतीक्षा यादीतील या गरजू दिव्यांगांच्या घरात दिवाळीचा आनंद पोहचवता येणार आहे. यामध्ये मदत आवशक असलेले काही दिव्यांग हे कॉटवर झोपून आहेत तर काही मतिमंद गटातील आहेत. अनामप्रेमच्या या किटमध्ये डाळ, तेल, साखर, चहा, उटणे,सुगंधी साबण, मास्क, सॅनिटायझर आदी आहे. अत्यंत गरजू दिव्यांगांना दिवाळी भेट देण्यासाठी अनामप्रेम प्रयत्न करीत आहे. इच्छुक दात्यांनी अनामप्रेमला आर्थिक मदत दिल्यास,किराणा मदत दिल्यास या दिव्यांगांना मदत देता येईल. किराणा किट सहयोगासाठी अनामप्रेमला मदत देण्यासाठी 9011020174/7350013802 यावर संपर्क साधावा,असे आवाहन अनामप्रेमचे डॉ.प्रकाश माधव शेठ,डॉ. सायली सोमण यांनी दात्यांना केले आहे.
