
अहमदनगर (७ नोव्हेंबर २०२०) : अहमदनगरचे नवनियुक्त पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी व्हायरल ऑडिओ क्लिप आणि सदर गोरख धंद्याचा तपास स्वतःच्या हाती घेतला असून लवकरच यातील सर्व तथ्य समोर येईल आणि या प्रकरणी आणखी कोण कोण मासे गळाला लागतील हे लवकरच समजेल.
अतिरिक्त पोलिस अधीक्षक दत्ताराम राठोड आणि नेवासे येथील पोलिस कर्मचारी गर्जे यांच्या संवादाच्या ऑडिओ क्लीपची चौकशी सुरू आहे. या ऑडिओ क्लीपसंदर्भातील प्राथमिक अहवाल पोलिस महानिरीक्षकांना पाठवला आहे. यातील दोषींवर कारवाई होणार असल्याचे पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांनी सांगितले. तसेच अवैध व्यवसायांशी संबंध असलेल्या पोलिस अधिकारी व कर्मचार्यांवर कारवाई करणार असून अशा कर्मचार्यांची माहिती घेतली जात असल्याचे असल्याचे त्यांनी सांगितले.पत्रकारांशी बोलताना पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांनी ही माहिती दिली. अतिरिक्त पोलिस अधीक्षक दत्ताराम राठोड आणि नेवासे येथील पोलिस कर्मचारी गर्जे यांच्यातील संवादाची ऑडिओ क्लीप नुकतीच सोशल मीडियामध्ये व्हायरल झाली होती.
या क्लिपमुळेच राठोड यांची अवघ्या एक महिन्यात नगरहून बदली झाली. या क्लिपमध्ये माल, अवैध धंदे, सेटिंग लावणे,रेड, धंदे सुरू करण्याचे आदेश द्या अशा प्रकारचे संवाद असल्याने ही क्लीप चांगलीच गाजली. या ऑडिओ क्लिप प्रकरणाचा तपास पोलिस अधीक्षक मनोज पाटील स्वत: करत आहेत. ते म्हणाले, अधिकार्यांच्या ऑडिओ क्लिपसंदर्भामध्ये अहवाल वरिष्ठांकडे पाठवला आहे. पुढील चौकशी मी स्वतः करत असून अनेकांची चौकशी या प्रकरणा संदर्भात केली आहे. अजूनही काहींची चौकशी होणे बाकी आहे.
